बाजार समिती प्रांगणातील व्यापा-यांचे धान्य भिजले

अवकाळी पाऊसामुळे व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान

0

जितेंद्र कोठारी, वणी: शनिवारी मध्यरात्री वणीत वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पाऊसामुळे कृषि उत्पन्न बाजार समितिमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले चना, तूर व सोयाबीनचे पोते भिजून अंदाजे 6 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

सध्या बाजार समितीत दररोज दीड ते दोन हजार क्विंटल कडधान्याची आवक आहे. वणी येथील 7 ते 8 परवानाधारक धान्य व्यापारी लिलाव प्रक्रिये मार्फत धान्याची खरेदी करतात. खरेदी केलेले माल व्यापारी समिती आवारात असलेले टिनशेड मध्ये पाला करून आपल्या गोडावूनमध्ये ठेवत असतात. मात्र लॉकडाउनमुळे मागील काही दिवसांपासून खरेदी केलेले चना, तूर व सोयाबीनचे हजारों पोते खुल्या जागेत ठेवून होते.

शनिवारी दिवसभर उकाडा असल्यामुळे सायंकाळी ढगाळ वातावरण झाले होते. परंतु मध्यरात्रीनंतर अचानक विजेच्या कडक्यासह जोरदार पावसाची सुरुवात झाली. पाऊस सुरू होताच धान्य व्यापारी निखिल केडीया व पियुष अग्रवाल रात्री 2.30 च्या सुमारास बाजार समितीत पोहचले व उघड्यावर पडलेले पोत्यांवर बाजार समितीतील दोन कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने ताडपत्री झाकण्यास सुरू केले. मात्र तो पर्यंत केडीया, अग्रवाल व इतर व्यापाऱ्यांचे अंदाजे 700 ते 800 पोते तूर, चना व सोयाबीन पाण्यात भिजले होते.

या बाबत वणी बहुगुणीशी बोलताना व्यापाऱ्यांनी बाजार समितीमध्ये मूलभूत सुविधा व ताडपत्रीचे अभाव असल्याची माहिती दिली. समिती आवारात सांडपाणी निकाषासाठी बनविलेल्या नाल्या कचऱ्यांनी तुडुंब भरून अवरुद्ध असल्यामुळे पावसाचे पाणी जमा होऊन धान्याचे पोते भिजल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली. शिवाय पावसामुळे हजारो क्विंटल धान्य भिजल्याची माहिती दिल्यानंतरही बाजार समितीचे सचिव, सभापती किंवा पदाधिकाऱ्यांनी समितीत भेट देऊन नुकसान पाहणीचे सौजन्यसुद्दा दाखविले नसल्याने व्यापाऱ्यांनी रोष व्यक्त केला.

वणी बाजार समितीमध्ये पावसामुळे व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून बाजार समितीचा पक्ष जाणून घेण्यासाठी समिती सभापती संतोष कुचनकर व सचिव अशोक झाडे यांच्या मोबाईलवर वारंवार फोन करून ही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.