तब्बल ३५० वर्षांची हलत्या गणपतीची परंपरा

हरिश्चंद्र पाटलांनी खाजगी गणेशोत्सवाला दिले सार्वजनिक स्वरूप

0

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: पार्थिव श्रीगणेशाची स्थापना कोण करणार? गणेशोत्सवाचं पुढे काय होणार? अत्यंत काळजीच्या स्वरात थकलेले गणेशभक्त सत्पुरुष मुनी महाराज विचारत होते. तारखेड्याच्या पाटलांच्या वाड्यात त्यांचा मुक्काम होता. आम्ही ही परंपरा पुढे चालवू. पाटलांनी शब्द दिला.

गणेशोत्सवात हाताने बनवलेली मातीचीच मूर्ती हवी, हा मुनी महाराजांचा आग्रह असायचा. दरवर्षी गणेशोत्सवात स्वतः हाताने बनवलेली मूर्ती ते स्थापन करायचे. त्याची विधिवत पूजा करायचे. या उत्सवाला नंतर लोकोत्सवाचं स्वरूप आलं. यात अनेकांचा सहभाग आजही असतो. ३५० वर्षांची म्हणजेच सात पिढ्यांची गणेशोत्सवाची परंपरा म्हणजे अमरावतीचा सांस्कृतिक वारसाच होय.

गणेशभक्तमुनी महाराजांची परंपरा पाटलांनी चालविली

मुनी महाराजांची गणेशोत्सवाची परंपरा मोठी आहे. मुनी महाराजांच्या इच्छेनुसार त्यांची समाधी श्री गणेशाच्या समोरच बांधली आहे. विक्रमजी नंतर ती प्रीतमजी, नारायणजी, हरिश्चंद्रजी , बाजीराव अशी हस्तांतरीत झाली. गजाननराव, विठ्ठलराव, नारायणराव ही बाजीरावांची मुलं. गजाननरावांची रामराव, हरिश्चंद्र ही मुलं.

गणेशभक्त मुनी महाराजांची समाधी

विठ्ठलरावांचे जीवन हे चिरंजीव. नारायणराव यांचे राजेश्चंद्र, सर्जेराव, अजय, प्रताप हे चिरंजीव. विठ्ठलरावांचे बाबासाहेब, अविनाश व जीवन हे चिरंजीव. आताच्या पुढच्या पिढीत नितीन, पांडुरंग, श्याम, आशिष, मुकुंद, आनंद, गजेंद्र, वीरेंद्र, सोमेश, अथर्व आणि स्वराजसह देशमुखांचा मोठा गोतावळा या उत्सवात असतो.

हरिश्चंद्र पाटलांच्या नावानेच फेमस झाला गणपती….

1835साली जन्मलेले हरिश्चंद्र नारायणजी पाटील हे अमरावतीचे मोकद्दम देशमुख होते. गावात त्यांचं मानाचं स्थान होतं. मुनी महाराजांची गणेशोत्सवाची परंपरा त्यांनी त्यांच्या वाड्यात सुरू केली. त्यात लोकांचा सहभाग वाढला. परंपरेने ते स्वतः गणपतीची मातीची मूर्ती तयार करत.

हरिश्चंद्र पाटील

त्याला आकर्षक रंग देत. मुनी महाराज छोटी मूर्ती करायचे. हरिश्चंद्र पाटलांनी मग मोठी मूर्ती बनवायला सुरुवात केली. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. जनतेचीदेखील त्यांच्यावर विशेष माया होती. त्यामुळे या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप आलं.

पूर्वीच्या फूट-दीड फूटाच्या मूर्तीच्याजागी आताची पाच-सहा फुटांची मोठी मूर्ती आली. तारखेड्यातला हा उत्सव तर हरिश्चंद्र पाटलांचा गणपती म्हणूनच पुढे फेमस झाला. तो आजतागायत आहे.

का टिकते वर्षभर गणपती मूर्ती

नवीन मूर्तीसोबत जुनी मूर्ती मंदिरात असते. अगदी मुनी महाराजांपासून इथं हातानेच मूर्ती तयार करण्याची परंपरा आहे. इथली मूर्ती विकत आणली जात नाही. आधीच्या वर्षीची मूर्तीदेखील जपून ठेवतात. ही मूर्ती टिकवण्यासाठी कोणतेच केमिकल्स वापरले जात नाहीत हे विशेष.

काळी माती, भसवा माती, राख, रुई आणि घोड्याची लीद मूर्ती तयार करण्यासाठी वापरतात. भसवा ही विशिष्ट माती कुंभाराकडून आणतात. ही मूर्ती आतून पोकळ असते. मूर्ती क्रॅक होऊ नये यासाठी विशिष्ट तंत्राने बनवली जाते. मूर्तीला आतून-बाहेरून गोवऱ्यांचा शेक दिला जायचा. त्यामुळे ही मूर्ती वर्षभर तशीच राहते. उच्च प्रतीचे रंग वापरले जातात. त्यामुळे मूर्तीचं ‘तेज’देखील बराच काळ कायम राहतं.

मातीला जनप्रेमाचे रंग

हरिश्चंद्र पाटील स्वतः हाताने मातीचा गणपती तयार करत. नंतर बाजीराव यांनी ही परंपरा चालवली. त्यांच्यानंतर गजाननराव मूर्ती करायचे. असं करत ही परंपरा रामरावांकडे आली. वंशपरंपरनेने शेवटचे पोलिसपाटील रामराव देशमुख. आज त्याचं वय 80च्या घरात आहे.

तारखेडा येथील मंदिरातच त्यांनी याही वर्षीचा उत्सवाचा गणपती बनवला. कोणताही साचा किंवा केमिकल्सचा यात वापर होत नाही. दोन महिन्यांपूवीच ते मातीच्या मूर्तीचं काम सुरू करतात. माती, घोड्याची लीद याची प्रक्रिया तर उन्हाळ्यापासूनच सुरू व्हायची. जवळपास ही पाच फुटांची मूर्ती आहे.

संपूर्ण मूर्ती हाताने करतात. पूर्वी ही मूर्ती वाळल्यावर त्याला शेंदूर लावायचे. मात्र अलीकडच्या काळात ती आकर्षक रंगांनी रंगविली जाते. परिसरातले चित्रकार सेवा म्हणून त्यात आकर्षक रंगकाम करतात. गणेशभक्त स्वप्निल रामेकर जुनघरे यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली.

बाप्पाचं विठ्ठल कनेक्शन

इथल्या मंदिरात विठ्ठल-रुक्मिणीची आकर्षक मूर्ती आहे. या घरात वारीची खूप जुनी परंपरा आहे. हरिश्चंद्र पाटलांना एका वारीत ही मूर्ती पंढरपुरच्या चंद्रभागा नदीत सापडली. मग ती घोड्यावरून अमरावतीला आणली. इथं हा पाटलांचा जुना वाडा होता.

सन 2000 राजाभाऊ देशमुखांनी याचा जीर्णोद्धार केला. खाजगी वाड्याचं आता मंदिर झालं. दर एकादशीला आणि चतुथीला वारकरी भजन, विशेषपूजा आणि अन्य कार्यक्रम इथे सुरूच असतात.

हलत्या मूर्तीचं मंदिर

गेल्या पाच-सहा वर्षांपासून रामराव ही मूर्ती करतात. त्याआधी त्यांचे काका नारायणराव ही मूर्ती करायचे. त्याही आधी रामरावाचे वडील गजाननराव हे मूर्ती बनवायचे. मनपातून सेवानिवृत्त झालेले राजेश्चंद्र नारायणराव देशमुख यांनीदेखील 5-6 वर्षांपूर्वी इथली गणेशमूर्ती बनवली.

आदल्यावर्षीची मूर्ती ही नव्या मूर्तीने रिप्लेस होते. जुनी मूर्ती बाजूला ठेवतात. नव्या मूर्तीची स्थापना होते. पूर्णपणे सिमेंटचं आकर्षक पक्क बांधकाम झालं. जणूकाही गणपतीचा परमनंट मांडवच आहे हा. इथल्या मूर्ती दरवर्षी हलतात. त्या जागी नवीन मूर्ती येते.

…. आणि गणेशोत्सव 11 दिवसांचा झाला

पूर्वी गावातले सर्व बॅण्ड गणपती विसर्जनासाठी तारखेड्यात उतरत. तेव्हा जनरेटरची सोय नव्हती म्हणून मिरवणुकीत गॅसबत्त्यांचा वापर व्हायचा. विसर्जन मिरवणुकीचा फार मोठा जल्लोश व्हायचा. सर्वच बॅण्डवाले आणि गॅसबत्तीवाले तारखेड्यात आल्याने इतरांना ते मिळत नव्हते.

त्यांची गैरसोय व्हायची. त्यातून वादही होत. मग दादासाहेब खापर्डे, मोरोपंत जोशी, वीर वामनराव दादांनी हरिश्चंद्र पाटलांसोबत चर्चा केली. त्यानुसार विसर्जन हे एक दिवस पुढे ढकलण्यात आलं. गावातील सर्वांच्या गणपतीचं विसर्जन झाल्यावर पौर्णिमेला तारखेड्यातल्या गणपतीच्या विसर्जनाची परंपरा सुरू झाली.

यात संपूर्ण शहरातील लोकांचा सहभाग असायचा. आता घरोघरी आणि गल्लोगल्ली गणपती बसायला लागलेत. त्यामुळे दिवसेंदिवस ही गर्दी कमी व्हायला लागली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गुलाबराव महाराजांपासून अनेक महामानव या ठिकाणी येऊन गेल्याचं कळलं. जुन्या वाड्यातून या मंदिरात येण्यासाठी एक भुयार आहे. ते आजही सुरूच आहे. तारखेडा परिसराची आजही कलेक्टर ऑफीसपर्यंत नोंद आहे.

अमरावतीचं जिल्हाधिकारी कार्यालय हे मौजे तारखेडामधे येतं. एवढ्या मोठ्या ‘साम्राज्या’ची ही पाटलांची परंपरा आहे. काही ग्रंथात या गणेशोत्सवाची नोंददेखील आढळते. शहराच्या एवढ्या जुन्या परंपरेला अनुभवण्यासाठी नक्कीच गेलं पाहिजे, असा गणेशभक्तांचा आग्रह आहे. अमरावतीच्या भाजीबाजारालगत हा परिसर आहे. जाणकार भक्त इथं आवर्जून दर्शनाला जातात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.