कोलगाव ते आबई फाट्या पर्यंत रात्रीपासून ट्राफिक जाम
विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील शिंदोला जाणाऱ्या मार्गावरील आबई फाटा ते कोलगाव रस्त्यावर मध्यरात्रीपासून वाहतूक ठप्प झाली आहे. या रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे असल्याने त्या खड्ड्यात एक ट्रक फसला. फसलेल्या ट्रकच्या बाजूने वाहन काढण्याच्या प्रयत्नात दुसराही ट्रक फसला. त्यामुळे हा रस्ता बंद झाला. परिणामी रात्रीपासून वणी-शिंदोला, वणी-कोरपना या मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. सध्या या मार्गावर ट्रक व वाहनांची लांब रांग लागली आहे. या ट्राफिक जामचा सर्वसामान्यांना चांगलाच फटका बसला आहे. सकाळी शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांना देखील याचा फटका बसला. आज सकाळी ते शाळेत जाऊ शकले नाही.
मुंगोली जवळील पूल तोडल्याने वेकोलिची होणारी वाहतूक ही कोलगाव रस्त्याने वळविण्यात आली आहे. या रस्त्याची क्षमता ही 20 टन इतकी आहे. मात्र या रस्त्यावरून 50 ते 60 टनाची अवजड वाहतूक सध्या होत आहे. याचा परिणाम नव्याने बनविण्यात आलेल्या रस्त्यावर होत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहे.
शिंदोला ते कोलगाव रस्त्यावर तर 5 ते 6 फुट रुंद खड्डे आहेत. या मार्गावर आबई फाट्याजवळ पाल यांच्या शेताजवळ गुरुवारी मध्यरात्री 1 ते 2 वाजताच्या सुमारास (शुक्रवार) वेकोलिचा एक ट्रक फसला. हा ट्रक फसून असतान रस्त्याच्या कडेने दुसऱ्या ट्रक चालकाने आपले वाहन काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणीही खड्डा असल्याने हा ही ट्रक फसला. परिणामी रात्री पासून या रस्त्यावरील वाहतून पूर्णपणे ठप्प झाली आहे.
मुलांची बुडली शाळा
या मार्गाने मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची ये-जा असते. अनेक विद्यार्थी वॅनने किंवा ऑटोने शाळेत जातात. शाळेची बस देखील या मार्गाने वाहतूक करते. वणी, शिरपूर, शिंदोला, वेळाबाई, या ठिकाणी कुर्ली, हनुमानगर, येनाडी, ऐनक, शेवाळा इत्यादी गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जात आले नाही. वाहतूक बंद असल्याने काही पालकांनी दुचाकीने मुलांना शाळेत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्राफीक जाम असल्याने दुचाकी वाहने देखील जाणे अवघड झाले आहे.
वाहतूक बंदचा फटका रुग्ण आणि शेतकऱ्यांना देखील बसला आहे. या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. सध्या या मार्गावरून केवळ दुचाकीने वाहतूक सुरू असली तरी चालकांना जाममधून दुचाकी काढण्यास चांगलेच कष्ट करावे लागत आहे. वाहतूक पूर्ववत कधी होईल? याची माहिती मिळू शकली नाही.
Comments are closed.