सागर मुने, वणी: वणीमध्ये वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक उपशाखा उघडण्यात आली आहे. मात्र वाहतूक नियंत्रण करण्याऐवजी दुचाकीस्वारांना टारगेट करण्याचा प्रकार दिसून येत आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याच चौकात असलेल्या ऑटोचालकावर कारवाई नाही आणि सर्वसामान्य दुचाकीस्वारांवर कारवाई, या परिस्थितीमुळे दुचाकीस्वारांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. या प्रकारामुळे वाहतूक पोलीस ऑटोचालकांवर महेरबान का असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहे.
गेल्या कित्येक दिवसापासून गावामधून जड वाहतुकीस सकाळी १० ते २ व सायंकाळी ४ ते ७ बंदी आहे, मात्र यावेळेत जड वाहनं राजरोसपणे गावातून वाहतूक करताना दिसते. जड वाहतूक करणा-यांवर क्वचितच कारवाई केली जाते. यातली काही जड वाहणं राजकीय पुढा-यांची आहेत, तर काही ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असणा-यांची. त्यामुळे कारवाई केली जात नाही असं बोललं जातं.
वणीतील टिळक चौकामध्ये ऑटो पॉइंट नसतानासुद्धा त्या ठिकाणी राजरोसपणे वाहणं उभी केली जाते. याठिकाणावरूनच ऑटोचालक प्रवासी भरतात. यामुळे वणी शहराची वाहतुक विस्कळीत होते, मात्र त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केलं जात असून सर्वसामान्यांवर मात्र कारवाईचा बडगा उगारलेला दिसत आहे.
(हे पण वाचा: राज्य महामार्गावरील वाहनांच्या अतिक्रमणामुळे अपघाताची शक्यता)
वणी शहरात उपजिल्हा वाहतुक शाखा सुरु करण्यात आले आहे मात्र हा विभाग केवळ नामधारी असल्याचं दिसत आहे. वाहतुक पोलीस शहरातील चौकात उभे असतात, पण ते ऑटोरिक्षावर कोणतीही कारवाई करत नाही. तर त्याच्याच बाजूला सर्वसामान्य मात्र भुर्दंड भरताना दिसतोय. एकुणच या प्रकारावरून वाहतूक तर सुरळीत नाही, पण भुर्दंड मात्र जोमात वसुलताना दिसत आहे.