विवेक तोटेवार, वणी: वणी शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून एकमार्गी वाहतूक सुरू करण्यात आली. एकमार्गी वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण तरी कमी झाले आहे, शिवाय वाहतुकीची होणारी कोंडी काही प्रमाणात संपुष्टात आली आहे. या एकमार्गी वाहतुकीच्या नियमाचे पालन करावयास लावण्यासाठी वाणीतील प्रत्येक चौकात एका वाहतूक कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. एकूणच जनतेच्या सुरक्षितेसाठी हा निर्णय घेण्यात आला हे निश्चितच. वाहतुकीच्या नियमाचे पालन करण्यास लावण्यासाठी वणीतील प्रत्येक चौकात बोर्डही लावण्यात आले आहेत. त्यानुसार वाहतूक कर्मचारी चौकापासून थोडे दूर उभे राहून आपले कर्तव्य बजावत असतात. यामागचा उद्देश हाच की एकमार्गी वाहतुकीमध्ये कुणीही चुकीच्या मार्गाने येऊ नये व आल्यास त्यांना दंड देण्यात येत असतो. साहजिकच त्याची ते रीतसर पावती देत असतात.
गुरूवारी वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे टिळक चौकात येऊन वाहतूक कर्मचाऱ्यांची कानउघाडणी करताना दिसले. त्यांच्या म्हणण्यानुसार बाहेरगावाहून येणाऱ्या वाहन चालकास वणीतील वाहतुकीचे नियम कसे माहीत राहणार. तो साहजिकच एकमार्गी वाहतुकीच्या दिशेने येणार. म्हणून कर्मचाऱ्यांनी चौकातच उभे राहावे की ज्यामुळे कुणीही नियम तोडणार नाही. परंतु वणीमध्ये अशा अनेक घटना झाल्या आहेत की काही युवक सरळ वाहतूक कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाहन आणतात. ज्यामध्ये वाहतूक कर्मचारी किरकोळ जखमीही झाले आहेत. अशा वेळी कर्मचाऱ्यांनी कुठे उभे राहून ड्युटी करावी हा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला.
दरम्यान आमदारांनी माझ्या आज्ञेचे पालन न केल्यास नोकरीवरून काढून टाकण्याबाबतही बोलले. हे सर्व होत असताना जनतेने एकच गर्दी केली होती. लहान कर्मचाऱ्यांना धमकविण्याचा हा प्रकार अगोदरही आमदाराकडून झाल्याचे ते बोलत होते. यावेळी वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक संग्राम ताटे यांनाही बोलविण्यात आले त्यांनी समजूत घालून यावेळी वातावरण शांत केले.