विदर्भवादी व शेतकरी नेते राम नेवले यांना वणीत श्रद्धांजली
स्वतंत्र विदर्भ चळवळीचे बिनीचे शिलेदार हरपले: प्रा. पुरुषोत्तम पाटील
जितेंद्र कोठारी, वणी: विदर्भवादी आंदोलनाचे नेते व शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते राम नेवले यांना सोमवारी वणीत श्रद्धांजली वाहण्यात आली. विदर्भवादी नेते रफिक रंगरेज यांच्या घरी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी स्वतंत्र विदर्भ चळवळीचे बिनीचे शिलेदार हरपला अशी शोकसंवेदना प्रा. पुरुषोत्तम पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी रफिक रंगरेज व मान्यवरांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. राम नेवले यांचे 16 नोव्हेंबर रोजी नागपूर येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. त्यानिमित्त संपूर्ण विदर्भात श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
मुळचे नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथील असलेले राम नेवले हे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक तसेच अलीकडेच स्थापन केलेल्या जय विदर्भ पार्टीचे संस्थापक होते. याशिवाय शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले होते.
दि. 8 ऑक्टोबर 1951 रोजी नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथे त्यांचा जन्म झाला. 1984 मध्ये ते शेतकरी संघटनेच्या संपर्कात आले. नागपूर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. सुरुवातीला शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेचे बिनीचे शिलेदार असलेले नेवले कालांतराने संघटनेतून बाहेर पडले. नंतरचे सर्व आयुष्य त्यांनी वेगळ्या विदर्भासाठी झोकून दिले. वेगळ्या विदर्भासाठी त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला.
राज्यात आणि केंद्रात सत्ता आल्यास स्वतंत्र विदर्भाची निर्मिती केली जाईल असे शपथपत्र त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लिहून घेतले होते. पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्या आंदोलनाची भाजपच सरकारने दखल घेतली नसल्याने ते व्यथित झाले होते. अलिकडे त्यांनी जय विदर्भ पार्टीची स्थापना केली होती. आगामी महापालिका निवडणूक लढण्याचा इरादाही त्यांनी व्यक्त केला होता. ‘तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजे,’ यासाठी सरकारने लावलेली बंदी झुगारून एचटीबीटी बियाण्याची लागवड करण्याचे आंदोलन त्यांनी केले होते.
वणी येथील श्रद्धांजली कार्यक्रमात प्रा. पुरुषोत्तम पाटील, रफिक रंगरेज, राजू पिंपळकर, बाळासाहेब राजूरकर, पुंडलिक पथाडे, अनिल गोवारदिपे, व्ही पी टोंगे, मोहितकर, सिद्धार्थ ताकसांडे, अलका मोवाडे, सुषमा मोडक, कलावती क्षीरसागर यांच्या सह विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते.
हे देखील वाचा:
अखेर ग्रामपंचायतच्या रिक्त पदांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
Comments are closed.