अपघातग्रस्त ट्रकचा इन्शुरन्स मिळण्यासाठी मालकाच झाला आरोपी

पलटी झालेल्या ट्रक अपघाताची बनावट कहाणी उघड, मालकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: बोरी पाटण रोडवर एक ट्रक पलटी झाला होता. यात ट्रकमध्ये असलेली एक व्यक्ती गंभीर जखमी झाली होती. मात्र त्यावेळी ट्रक चालवत असलेल्या चालकाडे ट्रक चालवण्याचा वैध परवाना नव्हता. इन्शुरन्स कंपनी अपघातग्रस्त ट्रकची नुकसान भरपाई देणार नाही, त्यामुळे खोटी तक्रार दाखल करण्यात आली. वैध परवाना असलेला ट्रकमालकच त्यावेळी गाडी चालवत असल्याचे दाखवून ट्रकमालक आरोपी झाला. मात्र इन्शुरन्स कंपनीच्या पडताळणीत ही बतावणी उघडकीस आली. त्यामुळे ट्रकमालक व इतर दोघांविरोधात विविध कलमान्वये पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मो. आदील मोहम्मद इस्माईल रा. मोर्शी जि. अमरावती याच्या मालकीचा (MH 27 X 6744) आयशर ट्रक आहे. दिनांक 30 सप्टेबंर 2019 रोजी रात्री उशिरा हा ट्रक परतवाडा जि. अमरावती येथून संत्र्याचा माल घेऊन बंगलुरू येथे निघाला. यावेळी अविनाश तायडे (रा. जामठी जि. अकोला) हा ट्रक चालवत होता. तर इतर दोन ट्रक चालक प्रमोद तायडे (रा. जामठी जि. अकोला) व अब्दुल वहाब अब्दुल सत्तार हे दोघे झोपून होते. पहाटे 5 वाजताच्या सुमारास बोरी ते पाटण रोडवरील दाभा या गावाजवळ हायवेवर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व ट्रक पलटी झाला. या अपघातात प्रमोद तायडे हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर अमरावीत येथील शासकीय रुग्णालयात महिनाभर उपचार चालला. उपचारातून बरे झाल्यानंतर त्याने पाटण पोलीस स्टेशन गाठत चक्क ट्रक मालकाविरोधात तक्रार दिली. मात्र ही तक्रार साफ खोटी होती.

या तक्रारीत त्याने माहिती दिली की ट्रक मालक मो. आदील मो. इस्माईल हा ट्रक चालवत होता. तर तो आणि अविनाश हे दोघे गाडीत झोपून होते. मालक मो. आदील याने निष्काळजीपणे गाडी चालवल्याने आपण जखमी झालो. त्यामुळे मालकावर गुन्हा दाखल करावा, अशी खोटी तक्रार प्रमोद तायडे याने दिली. प्रकरण झरी कोर्टात न्याय प्रविष्ठ झाले. दुसरीकडे ट्रक मालकाने टाटा एआयजी इन्शुरन्स कंपनीकडे नुकसान भरपाईसाठी क्लेम केला. मात्र इन्शुरन्स कंपनीच्या दावा पडताळणीत हे प्रकरण खोटे असल्याचे सिद्ध झाले.

ट्रकमालकच झाला आरोपी
इन्शुरन्स कंपनीची व पोलिसांच्या पडताळणीत या संपूर्ण बनवेगिराचा पर्दाफाश झाला. ट्रकमध्ये असलेल्या तिघांकडेही ट्रक चालवण्याचा वैध परवाना नव्हता. त्यामुळे अपघात झाल्यानंतर ट्रकची कोणतीही नुकसान भरपाई मिळणार नव्हती. इन्शुरन्सचा लाभ मिळण्यासाठी मालक मो. आदीलने इतर दोन ट्रकचालकाशी संगणमत केले. खोटी कहाणी रचली. ट्रक मालक मो. आदीलकडे ट्रक चालवण्याचा वैध परवाना असल्याने तो आरोपी होण्यास तयार झाला. तर जखमी झालेल्या प्रमोदने संगणमत करून मालकाविरोधात खोटी तक्रार दाखल केली. ट्रकचे आरटीओ परीक्षण करणे आवश्यक असताना ट्रक मालक घटनास्थळावरून ट्रक घेऊन निघून गेला व मालकाने आवश्यक ते पुरावे नष्ट केले.

सत्य परिस्थिती उघड होताच इन्शुरन्स कंपनीने याबाबत तक्रार केली. त्यानुसार क्राईम ब्रँच अकोल्याच्या पोलीस निरीक्षक विजया अलोणे यांच्या तर्फे पाटण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार अपघात झाला तेव्हा ट्रक चालवत असलेला चालक अविनाश तायडे, खोटी तक्रार दिलेला प्रमोद तायडे व ज्याच्या सांगण्यावरून संगनमत करून तक्रार दाखल करण्यात आली, तो ट्रकमालक मो. आदील या तिघांविरोधात भादंविच्या कलम 279, 338, 201, 203,120 ब, 34 यासह मोटार वाहन कायद्याच्या कलम 130(1), 177, 134 ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन मुलांची आई घरून बेपत्ता

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.