एका ट्रक चालकाचा दुस-या ट्रक चालकावर लोखंडी रॉडने हल्ला

रेल्वे सायडिंगवर ट्रक लावण्यावरून झाला होता वाद

0

जितेंद्र कोठारी, वणी: रेल्वे सायडिंगवर ट्रक लावण्यावरून झालेल्या वादातून एका ट्रक चालकाने दुस-या ट्रकचालकावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात ट्रकचालक जखमी झाला आहे. गुरुवारी दिनांक 10 जून रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. शंकर खोबरे असे जखमी झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी संतोष नामक ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शंकर सीताराम खोबरे (44) हे शिरपूर येथील रहिवाशी आहे. ते पीटीसी ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक म्हणून काम करतात. वणीतील रेल्वे सायडिंगवर त्यांच्या ट्रकची ट्रीप चालते. गुरुवारी दिनांक 10 जून रोजी संध्याकाळी ते कोळशाने भरलेला ट्रक (MH40 BG4270) घेऊन रेल्वे सायडिंगवर गेले होते. त्यांनी माल खाली करण्यासाठी रांगेत ट्रक लावला. दरम्यान ट्रक (MH34 AB0217) चा संतोष नामक चालक मद्यधुंद अवस्थेत शिविगाळ करत शंकर जवळ गेला व माझ्या ट्रकसमोर ट्रक का लावला असे म्हणत शंकरसोबत वाद घालू लागला. तिथे शंकर आणि संतोषमध्ये वादावादी झाली.

दरम्यान ट्रक खाली होत असताना शंकर ट्रकमागे होते. त्यावेळी संतोष हातात लोखंडी रॉड घेऊन आला व त्याने मागून शंकर यांच्या डोक्यावर प्रहार केला व त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात शंकर गंभीर जखमी झाले. तर हल्लेखोर संतोष तिथून निघून गेला. सदर घटना शंकर याने त्याच्या मालकाला सांगितली. त्यावरून शंकरने पोलीस स्टेशन गाठत संतोष नामक आरोपीविरोधात तक्रार दिली.

पोलिसांनी आरोपी संतोष विरोधात भादंविच्या कलम 324, 504, 606 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात जमादार वासूदेव नारनवरे करीत आहे. दरम्यान जखमी झालेल्या शंकर खोबरेच्या डोक्याला मोठी जखम झाली आहे. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आला. उपचारानंतर त्यांना सुटी देण्यात आली.

हे देखील वाचा:

अश्लील व जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी ऍट्रोसिटी दाखल

धाकट्या भावाचा मोठ्या भावावर चाकूने हल्ला

Leave A Reply

Your email address will not be published.