ज्योतिबा पोटे, मारेगाव: परिवहन विभागाने कोळसा भरलेला MH 26, AD 1371 या क्रमांकाचा ट्रक 17 ऑक्टोबर मंगळवारी कार्यवाही करून जप्त केला होता. मात्र दि. १८ आॅक्टोबरला पोलिसांची नजर चुकवून पहाटेच्या सुमारात हा ट्रक पळवुन नेल्याने गंभीर बाब मारेगाव पोलिसाचा लक्षात आली. 24 तासांच्या आतच पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले. आरोपींना ट्रक सहीत अटक करुन त्यांच्यावर विविध कालमांनुसार कार्यवाही करण्यात आली आहे. आरोपीचं नाव बालाजी गिते व आनंद केन्द्रे असून दोघेही नांदेड येथील रहिवाशी आहेत.
परिवहन विभागाने दिनांक 17 ऑक्टोबरला चंद्रपूरहून नांदेडकडे कोळसा भरून जाणारा ट्रक पकडला. ओवरलोड असल्याच्या कारणाने ही कार्यवाही करण्यात आली होती. परिवहन विभागाने हा ट्रक मारेगाव पोलिसांच्या ताब्यात दिला. दिवाळीच्या धामधुमीत या ट्रककडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले. याचाच फायदा घेऊन ट्रकचे मालक आणि ड्रायव्हर यांनी दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास हा ट्रक पळवून नेला.
सकाळी ट्रक नसल्याचे लक्षात येताच पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. पोलिसांना ट्रक मालकांवर आणि ड्रायव्हरवर संशय होता. त्यानुसार त्यांनी सूत्रे हलवली. अखेर हा ट्रक नांदेड येथे नेल्याची माहिती मारेगाव पोलिसांना मिळाली. मारेगाव पोलिसांनी लगेच पथक पाठवून हा ट्रक परत आणण्यासाठी पावलं उचलली. शनिवारी संध्याकाळी हा ट्रक मारेगाव पोलीस ठाण्यात पोहोचला.
चोरीस गेलेला ट्रक व मालाची किंमत सुमारे 9 लाख रूपये असून या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. सदर कामगिरी मा.उपविभागीय पोलीस आधिकारी विजय लगारे व पो.स्टे. प्रभारी आधिकारी सपोनि राहुलकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास आधिकारी पोलीस हवालदार मधुकर मुके, पोलीस हवालदार राजेंद्र चांदेकर, पोलीस शिपाई राहुल ओईम्बे यांनी पार पाडली. आरोपींवर गु.र.नं. 283/2017 (क) 379, 34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.