बहुगुणी डेस्क, वणी: भिंतीला छपाई करण्याच्या शुल्लक वादावरून दोन कुटुंबीयांत चांगलाच राडा झाला. दोन्ही कुटुंबातील व्यक्तींनी एकमेकांवर फावडे व सळाखीने वार केलेत. यात दोघांचे डोके फुटले तर दोघांना शारीरिक इजा झाली. सोमवारी सकाळच्या सुमारास झरी तालुक्यातील अडेगाव येथे ही घटना घडली. या प्रकरणी दोन्ही कुटुंबानी एकमेकांविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी 5 जणांवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.
पहिल्या तक्रारीनुसार, रामदास नथ्थू पाचभाई (72) हे अडेगाव ता. झरी येथील रहिवासी आहे. गावातच सुधाकर पुंडलीक पेटकर (50) हे त्यांच्या कुटुंबीयांसह राहतात. या दोन्ही कुटुंबात जागेचा वाद आहे. त्यावरून या दोन कुटुंबात पटत नाही. पाचभाई यांना त्यांच्या घराच्या भिंतीची छपाई करायची होती. सोमवारी दिनांक 9 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास पाचभाई यांनी पेटकर यांना त्यांच्या घरावरील टीन त्यांच्या हद्दीत सरकवण्याची विनंती केली. यावेळी दोघांत वाद झाला. सुधाकर पेटकर, त्यांचा मुलगा गणेश पेटकर (30) व जावई रमेश धुर्वे (35) सर्व राहणार अडेगाव हे पाचभाई यांच्या अंगावर मारण्यास धावले.
सुधाकर यांचा मुलगा गणेश पेटकर याने फावड्याने रामदास यांच्यावर फावड्याने वार केला. यात रामदास यांच्या बोटाला दुखापत झाली. तर सुधाकर याने हातातील सळाखीने रामदास यांच्या डोक्यावर वार केला. यात कानाच्या मागच्या बाजूस दुखापत झाली. याच वेळी रामदास पाचभाई यांचा मुलगा तुळशीराम हा मध्यस्थी करण्यास आला. तेव्हा त्यांनी तुळशीराम यांना देखील सळाखीने मारहाण केली. सुधाकर याचे जावई रमेश याने दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान गावातील लोक जमा झाले व त्यांनी भांडण सोडविले.
दुस-या तक्रारीनुसार, रामदास यांनी सुधाकर यांना छपाईसाठी टीन सरकवण्यास सांगितले. मात्र छपाईच्या बाजूने तुमची जागा नाही. त्यामुळे तुम्हाला या बाजूने छपाई करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र रामदास व त्याचा मुलगा तुळशीराम यांनी बळजबरी सुधाकर यांच्या घराचे टीन व फाटे सरकवण्यास सुरुवात केली. यावेळी रामदास पाचभाई यांनी शिविगाळ करीत त्यांच्या हातातील लोखंडी सळाख सुधाकर यांच्या डोक्यावर मारली. मारहाणीत सुधाकर यांचे डोके फुटले. तर तुळशीराम पाचभाई याने फावड्याने सुधाकर यांचा मुलगा गणेश याच्या डोक्यावर प्रहार केला. या मारहाणीत त्याचे देखील डोके फुटले. यावेळी रामदास यांनी पुन्हा छपाईसाठी वाद घालाल तर जीवे मारणार अशी धमकी दिली.
या घटनेत रामदास पाचभाई, तुळशीराम पाचभाई, सुधाकर पेटकर, गणेश पेटकर हे जखमी झाले आहेत. दोन्ही कुटुंबीयांतर्फे मुकुटबन पोलीस स्टेशन गाठून एकमेकांविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी दोन्ही तक्रारीनुसार पाचभाई व पेटकर कुटुंबीयांविरोधात तसेच पेटकर यांचे जावई धुर्वे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास मुकुटबन पोलीस करीत आहे.
(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )
https://www.facebook.com/groups/241871233000964
Comments are closed.