वणीत ‘बडे’की बिर्याणी, कोर्मा, बोटी-कलेजीचे हजारो शौकीन !

लालपुलिया रोडवरील दोन रेस्टॉरन्टवर धाड, मालकांना अटक

विवेक तोटेवार, वणी: चार दिवसांआधीच वणीतील जत्रा मैदानावरील कत्तलखान्याजवळ गोमांस व गायीचे शीर आढळून आले. त्यानंतर संपूर्ण वणीत खळबळ उडाली. या 8 जणांना अटक करण्यात आली तर काही फरार आहेत. या आरोपींवर वाढीव कलमे लावावी यासाठी ठिय्या आंदोलन देखील करण्यात आले. मात्र याचा बड्याच्या रेस्टॉरंटवर काहीही फरक पडला नाही ना खाणा-या शौकिंनांवर. हा मुद्दा ‘गरम’ असतानाच दुपारी लालपुलिया परिसरात आफताफ बिर्याणी व केजीएन बिर्याणी या दोन बिर्याणी सेंटरवर बजरंग दल व हिंदूत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी धाड टाकली. यावेळी त्यांना एका रेस्टॉरन्टमध्ये 30-35 किलो मांस तर दुस-या रेस्टॉरन्टमध्ये 5 किलो मांस आढळून आले. हे मांस गोमांस असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी दोन्ही मालकावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. दुकानात मोठ्या प्रमाणात मांस सापडल्याने वणीत मोठ्या प्रमाणात ‘बडे’की बिर्याणीचे शौकीन असल्याचे उघड झाले आहे. गोमांसाचा मुद्दा ‘गरम’ असताना देखील शौकिनांच्या बिर्याणीवरच्या उड्या मात्र कमी झालेल्या नाही, हे देखील स्पष्ट झाले आहे.

काय घडले दुपारी ?
सोमवारी संध्याकाळी हिंदूत्त्ववादी संघटनांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केले. तिथे बड्याच्या बिर्याणीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होती. दरम्यान हिंदूत्त्ववादी संघटनांनी पोलिसांतर्फे कोणतीही कार्यवाही होत नसल्याने स्वत: या ठिकाणी धाड टाकण्याचा निर्णय घेतला. दुपारी 1 वाजता हिंदूत्त्ववादी संघटनांचे कार्यकर्ते यांनी लालपुलिया परिसरात धावा बोलला. या ठिकाणी त्यांनी आफताफ बिर्याणी व केजीएन बिर्याणी या रेस्टॉरन्टवर धाड टाकली. यावेळी त्यांना मोठ्या प्रमाणात फ्रिजमध्ये मांस असल्याचे आधळून आले. सदर मांस हे चिकन किंवा बक-याचे मटन वाटत नसल्याने हे मांस गोमांस असल्याचा संशय आहे. त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. 

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आफताफ रेस्टॉरन्टमधून 30-35 किलो तर केजीएन रेस्टॉरन्टमधून 5 किलो असे सुमारे 40 किलो मांस जप्त केले. याचे नमुने पशू अधिकारी यांच्याकडे तपासणीसाठी पाठवले आहे. रेस्टॉरन्ट मालकाला सदर मांस कुठून आणल्याची विचारणा केली असता त्यांनी सदर मांस पाशा कुरेशी रा. मोमिनपुरा याच्याकडून आणल्याची माहिती दिली. 

बड्याच्या बिर्याणीचे वणीत मोठे शौकीन
रेस्टॉरन्टमध्ये ‘बडे’की बिर्याणी, कोर्मा, बोटी कलेजी इत्यादी डीश मिळतात. वणीतील काही रेस्टॉरन्टमध्ये रोज तर काही रेस्टॉरन्टमध्ये रविवार स्पेशल म्हणून ‘बडे’की ‘दावत’ असते. अवघ्या 40 ते 80 रुपयांमध्ये याच्या विविध डिश मिळतात. काही लोक स्वस्त म्हणून तर काही लोक जिभेचे चोचले परवण्यासाठी या डिश आवडीने खातात. यात ‘सर्व’च लोकांचा समावेश आहे. ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात लोक खास या दावत साठी येतात. धाड मारण्यात आलेल्या रेस्टॉ़रन्टमध्ये सुमारे 40 किलो मांस जप्त करण्यात आले. यावरून परिसरातील बड्याची असलेली मोठी मागणी स्पष्ट झाली आहे. शिवाय गोमांसाचा मुद्दा ‘गरम’ असताना देखील शौकिनांच्या बिर्याणीवरच्या उड्या मात्र कमी झालेल्या नाही, हे देखील स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी आफताब बिर्याणीचे संचालक सैय्यद इमरान (42) रा. एकता नगर वणी व केजीएन बिर्याणी सेंटरचे संचालक अयफाज खान इब्राहिम खान (41) रा. चिखलगाव व पाशा कुरेशी या तिघांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याच्या कलम 5 (ब), (क), (ड) 9 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गोमांस विक्रीचा मुद्दा समोर आल्याने काही रेस्टॉरन्टने तातडीने बडे की बिर्याणी विकणे बंद केल्याची माहिती आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.