विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील नांदेपेरा जवळ असलेल्या सोनापूर मार्गावर अवैधरीत्या रेती वाहून नेणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल व पोलीस विभागाने कारवाई करीत ट्रॅक्टर जप्त केले आहे. सदर कारवाई ही 19 जून रोजी पहाटे 3 वाजताच्या दरम्यान करण्यात आली. सदर रेती तस्करी ही गेल्या अनेक महिन्यापासून सुरू असल्याचे बोलले जात आहे.
नांदेपेरा येथील वाघाळा नाल्याजवळ रेती तस्करांनी रेती साठा जमा करून ठेवला आहे. मीडियामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत वृत्त येत होते. शेवटी महसूल प्रशासनाला जाग आली. गुरुवारी 18 जून रोजी नायब तहसिलदार वैभव पवार यांना रेती जात असल्याची यांना मिळाली. त्यांनी रात्रीच पोलीस विभागाचे डीबी प्रमुख गोपाळ जाधव, सुधीर पांडे व सुनील खंडागळे याना सोबत घेऊन सापळा रचला.
19 जून रोजी पहाटे 3 वाजताच्या सुमारास दोन विना नंबरचे ट्रॅक्टर त्यांनी सोनापूर मार्गावर पकडले. सदर रेती ही नांदेपेरा वरून राजूर येथे जात असल्याची माहिती आहे. दोन्ही ट्रॅक्टर जप्त करून पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहे. सदर ट्रॅक्टर हे प्रेमानंद भाऊराव धानोरकर रा. भांदेवाडा यांचे असून ते या गावाचे माजी सरपंच आहेत. यांच्यावर नियमानुसार दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती नायब तहसीलदार वैभव पवार यांनी दिली.