जितेंद्र कोठारी, वणी: दिवाळी निमित्त माहेरी गेलेल्या पत्नीला घरी आणायला जाणा-या वेकोलि कर्मचा-याचा अपघातात मृत्यू झाला. हि दुदैवी घटना दिनांक 12 नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास घडली. रमेश यादव पाझारे (55) असे मृतकाचे नाव आहे. ते विठ्ठलवाडी येथील रहिवाशी होते.
मृतक रमेश हे वेकोलि भालर येथे कार्यरत होते. दिवाळी निमित्त त्यांची पत्नी माहेरी चंद्रपूर येथे गेल्या होत्या. शुक्रवारी दुपारी त्यांना वणीला परत आणण्यासाठी रमेश हे आपल्या दुचाकीने (MH29 BB 6160) चंद्रपूरला जात होते. दरम्यान वाटेतच दुपारी 2.30 ते 3 वाजताच्या सुमारास नायगाव (बेलोरा) फाट्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात रमेश यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
सदर घटनेची शिरपूर पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रकरणाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शविच्छेदनानंतर पार्थिव अतिम संस्काराकरिता कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. गाडीला वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला की गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला हे अद्याप कळू शकले नाही.
पुढील तपास शिरपूरचे ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. रमेश त्यांच्या पश्चात दोन मुलं व पत्नी असा आप्त परिवार आहे. त्याच्या अकाली मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दुचाकीस्वारांनी हेलमेट वापरण्याचे आवाहन
काम, नोकरी, बाजार इत्यादी कारणांसाठी मोठ्या प्रमाणात लोक तालुक्याच्या ठिकाणी दुचाकीने येतात. तसेच अनेक लोक वणीतून नोकरी व इतर कामांसाठी दुचाकीने परगावी जातात. अवजड वाहनांची रहदारी, खराब रस्ते किंवा वन्य प्राणी आडवे आल्याने अपघाताच्या घटना नित्याच्याच आहे. तालुक्यात एका महिन्यात अनेकांना अपघातामुळे जीव गमवावा लागतो. या अपघातात सर्वाधिक मृत्यू हे डोक्याला गंभीर ईजा झाल्याने होतात. अनेक तरुण तसेच घरातील कर्त्याधर्त्या व्यक्तींना डोक्यावर केवळ हेलमेट नसल्याने जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे फक्त डोक्यावर हेलमेट असल्याने अनेकांचा जीव वाचला आहे. त्यामुळे दुचाकी चालकांनी हेलमेटचा वापर करावा असे नम्र आवाहन ‘वणी बहुगुणी’तर्फे करण्यात येत आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.