गणेशपूरजवळ अपघात, कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

घोन्शावरून गावी परतताना झाला अपघात

जितेंद्र कोठारी, वणी: घोन्श्यावरून गावी परत जाणा-या एका इसमाच्या दुचाकीला एका भरधाव कारने जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. संध्याकाळी 6.45 वाजताच्या सुमारास गणेशपूर जवळ कायर रोडवर घटना घडली. अशोक झाडे असे जखमीचे नाव असून त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अशोक झाडे वय अंदाजे 52 वर्ष हे तालुक्यातील अहेरी बोरगाव येथील रहिवाशी आहे. आज गुरुवारी दिनांक 3 फेब्रुवारी रोजी ते आपल्या हिरो होन्डा पॅशन या दुचाकीने (Mh 29 AQ7414)  घोन्सा येथे एका कार्यक्रमानिमित्त गेले होते. संध्याकाळी घोन्श्यावरून वणी मार्गे अहिराला गावी परतत होते. पावने सात वाजताच्या सुमारास वणीहून एक कार मुकुटबनच्या दिशेने जात होती.

गणेशपूरपासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या पेट्रोलपम्पसमोर या भरधाव कारने अशोक यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत अशोक जखमी झाले. त्यांच्या पायाला जबर दुखापत झाली. घटनास्थळाजवळच गणेश गोहोकर, विनम्र कुईटे, सुधीर दुधलकर, निखिल मुत्तलवार, स्वप्निल कांबळे हे उभे होते. अपघात झाल्याचे कळताच त्यांनी रस्त्यावरून जाणारा एक ऑटो थांबवला व त्यात टाकून जखमीला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

प्राथमिक उपचारानंतर जखमीला वणीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धडक दिल्यावर कारचालक कार घेऊन पसार झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घटनेचा पंचनामा केला.  

हे देखील वाचा: 

सुगंधीत तंबाखू विक्री प्रकरणातील आरोपीला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Comments are closed.