अपघात: बेलोरा फाट्याजवळ उभ्या ट्रकला दुचाकीची भीषण धडक

वडिल व मुलाचा जागीच मृत्यू तर आई व 2 वर्षांची चिमुकली बचावली

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील टोक असलेल्या बेलोरा फाट्याजवळ एका दुचाकीने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात बापलेकांचा जागीच मृत्यू झाला तर मायलेक या अपघातात वाचले आहे. मात्र त्यात आईची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. तर 2 वर्षांची चिमुकली बचावली आहे. संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

सविस्तर वृत्त असे की मृतक गणेश चंद्रभान मडावी (28) हे नायगाव येथील रहिवासी होते. शुक्रवारी दिनांक 20 जानेवारी रोजी 7 वाजताच्या सुमारास ते त्यांच्या दुचाकीने त्यांची पत्नी मयुरी गणेश मडावी (26), मुलगा शिव गणेश मडावी (4) व मुलगी ईश्वरी (2) यांना घेऊन घुग्गुसच्या दिशेने जात होते. रात्री 7.30 वाजताच्या सुमारास बेलोरा फाट्याजवळील कोळसा खाणीच्या चेकपोस्टजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकला मडावी यांच्या दुचाकीने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यात वडील गणेश व मुलगा शिव यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची होताच परिसरातील नागरिकांनी याची माहिती शिरपूर पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. या अपघातात पत्नी मयुरी ही गंभीर जखमी झाली आहे. तिला चंद्रपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अपघातात दोन वर्षाची चिमुकली ईश्वरी हिला मात्र कोणतीही इजा झाली नाही. या अपघातामुळे नायगाव येथे शोककळा पसरली आहे. प्रकरणाचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

उभे ट्रक ठरतायेत यमदूत !
गेल्या दोन महिन्यात वणी व परिसरात उभ्या ट्रकमुळे 4-5 मोठे अपघात झाले आहे. तर अनेक छोटे अपघात झाले आहे. उभ्या ट्रकमुळे अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. काही ट्रक तर बंद अवस्थेत असल्याने बराच काळ एकाच ठिकाणी उभे राहतात. विशेष म्हणजे बंद ट्रक समोर ना बॅरिकेट लावले जात ना कोणते दगड लावले जात. शिवाय अनेक ट्रकमागे रेडीयम नसल्याने दुचाकी चालकांना ट्रक उभे असल्याचे दिसत देखील नाही. उभे ट्रक यमदूत ठरत असले तरी यावर अद्यापही वाहतूक विभागाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

Comments are closed.