कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकवर मागून आदळली दुचाकी

नांदेपेरा जवळ घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

जितेंद्र कोठारी, वणी : कोळशाची वाहतूक करणाऱ्या खाली ट्रकच्या मागील भागात भरधाव दुचाकी आदळून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. वणी नांदेपेरा मार्गावर नांदेपेरा जवळ आज सायंकाळी 5 वाजता दरम्यान ही घटना घडली. अनिल कृष्णाजी लांबट (55) रा. दांडगाव असे अपघातात जखमी व्यक्तीची नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार दांडगाव येथील अनिल लांबट आपल्या बजाज प्लॅटिना मोटरसायकल क्र. (MH29S9328) ने कामानिमित्त वणीला आले होते. वणी येथून परत गावाकडे जात असताना नांदेपेरा जवळ रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रक क्र. (MH34 BG4667) वर त्यांची दुचाकी मागून जोरदार आदळली. या धडकेत अनिल लांबट यांच्या डोक्याला जबर मार लागली. अपघाताची माहिती मिळताच वणी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन जखमीला वणी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

दुचाकीस्वारांनी हेलमेट वापरण्याचे आवाहन

काम, नोकरी, बाजार इत्यादी कारणांसाठी मोठ्या प्रमाणात लोक तालुक्याच्या ठिकाणी दुचाकीने येतात. तसेच अनेक लोक नोकरी व इतर कामांसाठी दुचाकीने परगावी जातात. अवजड वाहनांची रहदारी, खराब रस्ते किंवा वन्य प्राणी आडवे आल्याने अपघाताच्या घटना नित्याच्याच आहे. या अपघातात सर्वाधिक मृत्यू हे डोक्याला गंभीर ईजा झाल्याने होतात. अनेक तरुण तसेच घरातील कर्त्याधर्त्या व्यक्तींना डोक्यावर केवळ हेलमेट नसल्याने जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे फक्त डोक्यावर हेलमेट असल्याने अनेकांचा जीव वाचला आहे. त्यामुळे दुचाकी चालकांनी हेलमेटचा वापर करावा असे आवाहन ‘वणी बहुगुणी’ तर्फे करण्यात येत आहे

Comments are closed.