विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील भालर येथे रविवारी सकाळच्या सुमारास जुन्या वादातून दोन इसमांनी एकाला काठीने मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत एका व्यक्तीच्या डोक्याला इजा झाली. मात्र सकाळी मार खाणा-या व्यक्तीने रात्री मारहाणीचा वचपा काढत मारहाण करणा-याला फावड्याने मारले. या दोन्ही घटनेबाबत परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी मंगेश तुळशीराम कनाके (23) व सुनील कनाके (34) दोघेही भालर येथील रहिवाशी आहे. रविवारी दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास आरोपी मंगेश व सुनीलने फिर्यादी प्रशांत श्यामराव देठे (35) याच्यासोबत वाद झाला. प्रशांत याने विरोध करताच मंगेश व सुनील यांनी प्रशांतला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत प्रशांतच्या हातावर, पाठीवर व डोक्याला मार लागला आहे.
मारहाण केल्याने जखमी झालेल्या प्रशांतने याचा वचपा काढण्याचे ठरवले. रविवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास प्रशांतने त्याच्या भाऊ प्रदीप श्यामराव देठे याला सोबत घेऊन मारहाण करणारे मंगेश व सुनील यांना गाठले व त्यांना लोखंडी फावड्याने मारहाण केली. यात मंगेशच्या डोक्याला इजा झाली आहे.
सकाळी झालेल्या घटनेवरून प्रशांत देठे याने आज सोमवारी सकाळी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. वणी पोलिसात आरोपी मंगेश व सुनीलवर कलम 324, 34 भादंवि नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर रात्रीच्या घटनेवरून आज संंध्याकाळी फिर्यादी मंगेश कनाके याच्या तक्रारीवरून आरोपी प्रशांत देठे व त्याचा भाऊ प्रदीप देठे विरोधात भादंविच्या कलम 324, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.