कुंभारखनीत शिरली चोरट्यांची टोळी, सुरक्षा रक्षकांनी पकडले रंगेहात

पाठलाग करून दोघांच्या आवळल्या मुसक्या तर इतर फरार

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील वेकोलिच्या घोन्सा (कुंभारखनी) परिसरात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणांना सुरक्षा रक्षकांनी पकडले. मात्र त्यांचे इतर साथीदार पसार होण्यात यशस्वी झालेत. ही घटना 21 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 3.30 वाजताच्या सुमारास घडली. पकडलेल्या तरुणांकडून दोन बॅटरी, तीन मोटरसायकली आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले. सध्या तरी ही टोळी बॅटरी चोरीच्या उद्देशाने वेकोलि परिसरात गेल्याचे समोर आले आहे. कुंभारखनी परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना उघडकीस येत आहे.   

तक्रारीनुसार, वेकोलिच्या घोन्सा क्षेत्रात 20 ऑगस्ट 2025 रात्री 10 वाजल्यापासून 21 ऑगस्ट 2025 सकाळी 6 वाजेपर्यंत रात्रपाळीत सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान सुरक्षा रक्षकांना रात्री 3.30 वाजताच्या सुमारास चोरीचा प्रयत्नात असलेली एक टोळी दिसली. सुरक्षा रक्षकांनी त्यांचा पाठलाग केला. दरम्यान दोन संशयित सुरक्षा रक्षकांच्या हाती लागले. तर इतर फरार झाले. त्यांच्याकडून एक मोठ्या नायलॉन थैलीत दोन बॅटरी, एक व्हिवो कंपनीचा मोबाईल, एक रेडमी मोबाईल, तसेच तीन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या.

जप्त केलेल्या वस्तूंमध्ये एक फेन्सिंग एनरजायझर, दोन बॅटरी व तीन मोटारसायक यांचा समावेश आहे. पकडलेल्या तरुणांनी त्यांचे नावे राजवीर रमेश कोली (वय 22) आणि सिद्धार्थ रमेश थोराण (वय 19), दोघेही रा. गोकुळनगर, वणी, अशी सांगितली. तर त्यांचे इतर साथीदार पळून गेल्याची माहिती दिली. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

बोर्डा शिवारातून चोरल्या होत्या बॅटरी
सकाळी घोन्सा वेकोलि क्षेत्रातून (कुंभारखनी) दोन चोरांना पकडल्याची वार्ता परिसरात पसरली. दरम्यान बोर्डा येथील मिलन बाबाराव आस्कर (वय 24, रा. बोर्डा, ता. वणी) यांना त्यांच्या शेतातील दोन बॅटरी चोरीला गेल्याचे आढळले. त्यांनी तात्काळ वणी पोलीस स्टेशन गाठले व चोरीबाबत तक्रार नोंदवली.

वणी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, पसार झालेल्या साथीदारांचा शोध सुरू आहे. ही घटना स्थानिकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे.

Comments are closed.