बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील शास्त्रीनगर भागात दारूच्या नशेत असलेल्या गवंडी कामगाराने एका मजुरास शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना गुरुवार, दि. 21 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, संदिप साधुजी गौरकार (वय 42, रा. शास्त्रीनगर, वणी) हे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. गुरुवारी दुपारी ते आपल्या भावाच्या (विनोद गौरकार) शास्त्रीनगर येथील पानठेल्यासमोर उभे होते. त्याचवेळी मंदर येथील गोपाल कवडु बुरटकर (वय 35) हा दारूच्या नशेत तेथे आला आणि संदिप गौरकार यांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. संदिप यांनी विरोध केला असता, त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत थापडाबुक्क्यांनी मारहाण केली.
घटनेच्या वेळी योगेश पावडे, विनोद गौरकार आणि किसन पोतराजे यांनी मध्यस्थी करून भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आरोपीने “तु मला ओळखत नाहीस, मी कोण आहे” असे म्हणत पुन्हा मारण्याची धमकी दिली. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
संदिप गौरकार यांनी या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपी गोपाल कवडु बुरटकर याच्यावर बीएनएसच्या कलम 115(2), 296, 351(2), 351(3), 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलिसांकडून सुरू आहे.



Comments are closed.