निकेश जिलठे, वणी: महाराष्ट्रातील तरुण रोजगार मागत आहेत. शेतकरी हमीभाव मागतो आहे. मात्र, भाजपा त्यांना काश्मीरमधील 370 रद्द केल्याचे सांगत आहे. अमित शाहा माझ्यावर टीका करताय की उद्धव ठाकरे कलम 370 रद्द करण्याला विरोध करणाऱ्यांच्या बाजूला जावून बसलेत. मात्र अमित शाहा विसरतात की 370 रद्द करताना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. 370 कलम रद्द केल्यावरही सोयाबिन, कापसाला भाव मिळतो का? शेतक-याला नुकसान भरपाई मिळते का? काश्मिरच्या 370 कलमाचा माझ्या शेतक-यांशी काहीही संबंध नाही. हे कलम ना शेतक-यांच्या शेतमालाला भाव देऊ शकत, ना इथल्या कोळसा उद्योगात स्थानिकांना रोजगार देऊ शकत. अशी टिका उद्धव ठाकरे यांनी वणीतील सभेत केली.
ते महाविकास आघाडी व शिवसेनेचे उमेदवार संजय निळकंठ देरकर यांच्या प्रचारासाठी सोमवारी वणीत आले होते. यावेळी त्यांनी महायुती सरकार व शिंदे सरकारचा खरपूस समाचार घेतला. दरम्यान उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टरने वणीत आगमन होताच त्यांच्या बॅगांची झडती घेण्यात आली. त्यामुळे उद्धव ठाकरे चांगलेच संतापले. त्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. आजचा महाराष्ट्राच्या राजकारणाचा दिवस बॅगच्या झडतींनीच गाजला.
उद्धव ठाकरे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की अदाणी हे आता मुंबईपुरते मर्यादीत राहिली नाही तर ते आता तुमच्या भागातही पोहोचले आहेत. चंद्रपूर येथील शाळा अदाणीला चालवायला दिली. मोदी सरकार एअरपोर्ट, बंदर सर्वच अदाणीला देत आहे. विज प्रकल्प अदाणीला दिला आहे. यापुढे महाराष्ट्रातील लोकांनी वीज, सौर उर्जा अदाणीकडून विकत घ्यायची का? अदाणीचा प्लॉन्ट लागला आहे गुजरातला, जमिनीचे भाव वाढले गुजरातमधले, रोजगार मिळाला गुजरातमधल्या लोकांना आणि आम्ही काय फक्त त्यांचे भांडी घासायची का? असेही ते म्हणाले. याशिवाय त्यांनी भाजपच्या बटेंगे तो कटेंगेचा देखील समाचार घेतला. त्यांचा उद्देश महाराष्ट्राला लुटेंगे व दोस्तो को बाटेंगे असा आहे. असे ते म्हणाले.
उद्या मोदी, शाहा यांच्या बॅग तपासणार का?
सभेच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी बॅगांची झडती घेण्यावर टिका केली. ते म्हणाले की एक लक्षात घ्या तुम्हाला कुठेही चौकशीसाठी किंवा तपासणीसाठी अडवले तर त्यांचीही चौकशी करा. ते कुठे नोकरीला आहेत हे तपासा. जसे ते आपले खिसे तपासतात तसे त्यांचेही तुम्ही खिसे तपासा कारण हा आपला अधिकार आहे. माझा अधिका-यांवर राग नाही मात्र त्यांनी कधी मोदी, शाहांची, फडणवीस, शिंदे यांची बॅग तपासली का? यांच्या बॅग जर निवडणूक अधिकारी तपासणार नसेल तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते त्यांची बॅग तपासणार, असे ही ते म्हणाले.
काय घडले हेलिपॅडवर? उद्धव ठाकरेंनी केला व्हिडिओ व्हायरल
दुपारी उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाले. यावेळी काही अधिकारी त्यांची बॅग तपासण्यासाठी आले. बॅग तपासयला आलेल्या चमुंचा उद्धव ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला. स्वत: व्हिडीओ घेताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना अनेक सवाल केले. “आतापर्यंत कुणाकुणाची बॅग तपासली? उद्या देवेंद्र फडणवीस, मोदी, शाह, मिंधे आलेत तर त्यांची बॅग तपासणार का? ते आल्यावर त्यांची बॅग तपासल्याचा व्हिडीओ मला पाठवायचा, तिकडे शेपूट नाही घालायची. ठीके तपासा माझी बॅग, माझा युरिन पॉटही तपासा” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
Comments are closed.