उज्ज्वला खनगण ठरल्या ग्राविकाच्या पहिल्या महिला अध्यक्ष

0

विवेक तोटेवार, वणी; ग्रामीण सहकारी क्षेत्र म्हटले म्हणजे पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाते. परंतु याला पहिला छेद दिला तो वागदराच्या उज्ज्वला अनिल खनगण या महिलेने. नुकत्याच पार पडलेल्या वागदरा ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत त्यांची अध्यक्ष म्हणून अविरोध निवड झाली. या निवडीमुळे वणी विभागातील ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या इतिहासात उज्ज्वला खनगण ह्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या.

वणी शहरालगत असलेले वागदरा हे छोटेसे टुमदार गाव. कोणतेही काम एकोप्याने करावयाचे अशी त्या गावाची विशेष परंपरा. ग्राविका निवडणूक ही सुद्धा याला अपवाद ठरत नाही या संस्थेची प्रत्येक निवडणूक ही अविरोध होते. या विशेष परंपरेत यावेळेला वागदारा ग्रामस्थांनी वेगळाच मानाचा पायंडा पाडला. सर्वसंमतीने त्यांनी या संस्थेच्या अध्यक्ष म्हणून उज्ज्वला अनिल खनगण यांची निवड केली.
उज्ज्वला खनगण ह्या गावातील एका मोठया महिला बचत गटाच्या सचिवसुद्धा आहेत. या बचत गटातील महिलांच्या सहकार्याने त्या समर्थपणे या बचत गटाचा कारभार सांभाळतात. आता ग्रामविविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सुद्धा आपण समर्थपणे सांभाळू असा आत्मविश्वास त्या व्यक्त करतात.

वणी विभागातील ग्रामविविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या इतिहासातील या ग्राविका संस्थेच्या अध्यक्ष म्हणून उज्ज्वला खनगण यांना विराजमान करण्याचे श्रेय या संस्थेचे उपाध्यक्ष शंकर वैद्य यांच्यासह विलास उपाध्ये, रत्नाकर ठावरी, छगन पोतले, पुरुषोत्तम वैद्य, यादव ठावरी, श्रीराम पावडे, सुवर्णा पावडे, माधव पावडे, किशोर पावडे आणि गजानन जाधव या संचालकांना जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.