उकणी प्रकल्पग्रस्तांचा बेलोरा चेकपोस्टवर चक्काजाम; वाहतूक ठप्प
“आश्वासनांची अंमलबजावणी नाही तर संघर्ष तीव्र करू” – संजय खाडे
बहुगुणी डेस्क, वणी: वणी तालुक्यातील उकणी बेलसनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा संघर्ष शनिवारी पुन्हा उफाळून आला. शनिवार, दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सकाळी उकणी वासीयांनी बेलोरा गावाजवळील चेकपोस्टवर चक्काजाम आंदोलन करीत कोळसा वाहतूक रोखून धरली. त्यामुळे वणी-चंद्रपूर मार्गे घुग्घुस मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले. अखेर वेकोलिच्या अधिका-यांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
उकणी खंड 1 परिसरातील सुमारे 85 टक्के शेतकऱ्यांच्या जमिनी आधीच संपादित झाल्या आहेत. मात्र उर्वरित 170 शेतकऱ्यांची सुमारे 600 एकर जमीन अद्याप संपादित केली गेली नाही. वेकोलि सदर जमीन संपादित करण्यास चालढकल करीत असल्याने शनिवारी दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सकाळी उकणी वासियांनी चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनामुळे या मार्गावर ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
वाहतूक विस्कळीत झाल्याने व आंदोलकांसमोर नमते घेत वेकोलि निलजई उपक्षेत्राचे प्रबंधक एस के सुतार व वेकोलिचे क्षेत्रीय योजना अधिकारी एस पी सिंग यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. चर्चा सकारात्मक झाली व आंदोलकांना लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर शेतकरी संघर्ष समितीने आंदोलन तुर्तास स्थगित करीत असल्याचे जाहीर केले.
अन्यथा संघर्ष तीव्र करू -संजय खाडे
आजचे आंदोलन हे शेतकऱ्यांच्या संयमाचा झालेला उद्रेक होता. वर्षानुवर्षे आश्वासने देऊन प्रकल्पग्रस्तांची फसवणूक केली जात आहे. आम्हाला संघर्ष नको आहे, पण न्याय नाकारला तर संघर्ष अपरिहार्य ठरेल. जमीन संपादन, पुनर्वसन, आश्रितांना नोकऱ्या आणि प्रलंबित नुकसानभरपाई हे प्रश्न तातडीने मार्गी लावले गेले पाहिजेत. वेकोलिने दिलेले लेखी आश्वासन जर प्रत्यक्षात उतरले नाही तर यापुढील आंदोलन अधिक तीव्र आणि व्यापक स्वरूपाचे असेल.
– संजय खाडे, प्रदेश सचिव काँग्रेस

आंदोलनात शेतकरी संघर्ष समितीचे पुरुषोत्तम भुसारी, अमोल पुरडकर, पराग तुराणकर, शामसुंदर जुनारकर, सचिन लोडे, घनश्याम खाडे, सुरेश धपकस, चंद्रकांत जीवतोडे, पद्माकर झाडे, महेश पाटील, विकास लालसरे, संतोष धांडे, किसन पारशिवे, ऍड सूरज महातळे, संजय बांदुरकर यांच्यासह उकणी व बेलसरी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments are closed.