पावसामुळे उकणी-वणी रस्ता बंद, वेकोलिविरोधात रोष

चिखलात फसलेले वाहनं काढण्यासाठी लोकांची दमछाक

बहुगुणी डेस्क, वणी: मंगळवारी दुपारी तालुक्यात वादळी वा-यासह मुसळधार पाऊस झाला. उकणी परिसरातही पाऊस झाला. पावसामुळे उकणी-वणी रस्त्यावर चिखल झाले व अनेक चारचाकी वाहने यात फसले. परिणामी हा रस्ता बंद झाला. बुधवारीही दुपार पर्यंत हा रस्ता बंद होता व या मार्गावरून केवळ दुचाकीची वाहतूक सुरु होती. वेकोलि संथगतीने काम करीत असल्याने गावकरी संतप्त झाले आहेत.

उकणी परिसरात मोठ्या प्रमाणात कोळश्याच्या खाणी आहेत. या खाणीतून काढलेली माती ही परिसरातच टाकली जाते. वेकोलिने उकणी-वणी रोडलगत माती डम्प केली होती. चारपाच महिन्यांपूर्वी हा मातीचा ढिगारा खचला व ही माती रस्त्यावर आली. त्यामुळे उकणी-वणी हा मार्ग बंद झाला. वेकोलिने दुस-या पर्यायी मार्गाचे काम सुरू केले. गावालगत असलेल्या नदीचे पाणी पावसाळ्यात रस्त्यावर येऊ नये व रस्ता बंद होऊ नये म्हणून वेकोलिने डम्पिंगच्या मातीचा उपयोग करून नवीन रस्ता उंच केला.

नवीन रस्त्याचे काम संथगतीने सुरु आहे. एकाबाजूला खडी तर दुस-या बाजूला माती आहे. मंगळवारी दुपारी पाऊस आल्यावर डम्पिंगच्या मातीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाले. त्यामुळे उकणीहून वणीला जाणारे व वणीहून उकणी जाणारे वाहने या रस्त्यात फसले. ही फसलेली वाहने काढण्यासाठी चालकांना चांगलेच कष्ट घ्यावे लागले. दोरखंड व लोकांची मदत घेऊन चिखलात फसलेले वाहने काढण्यात आले. रस्त्यावर चिखल असल्याने अद्यापही वणीकडे जाणारा मार्ग बंद असून केवळ दुचाकी या मार्गावरून ये-जा करीत आहे. यामुळे वेकोलिविरोधात रोष व्यक्त केला जात आहे.

Comments are closed.