अज्ञात वाहनाची मजुराला धडक, मजूर ठार

सोयाबिन काढण्यासाठी आलेल्या मजुराचा दुर्दैवी मृत्यू

बहुगुणी डेस्क, वणी: बाहेर राज्यातून झरी तालुक्यात सोयाबिन काढण्याच्या कामाला आलेल्या एका मजुराला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात मजुराचा मृत्यू झाला. अर्धवन ते कमलापूर रस्त्यावर हा अपघात झाला. शुक्रवारी दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी मुकुटबन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कामासाठी आलेल्या मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मजूर वर्गात हळहळ व्यक्त होत आहे.

दरवर्षी झरी तालुक्यात परराज्यातून सोयाबिन काढण्यासाठी मजूर बोलावले जातात. मृत कौशलकुमार रामचंद्रकुमार वर्मा (35) रा. अलवर राजस्थान येथील रहिवासी होता. तो यावर्षीही त्याच्या 10 साथीदारांसह झरी तालुक्यातील अर्धवन येथे सोयाबिन काढण्यासाठी आला होता. हे सर्व मजूर दिवसभर सोयाबिन काढण्याचे काम करून रात्री अर्धवन शेतशिवारातील एका बंड्यात राहायचे. गुरुवारी दिनांक 10 रोजी सर्व मजुरांनी दिवसभर काम केले. 5.30 वाजताच्या सुमारास सर्व मजूर बंड्यावर आराम करण्यासाठी गेले. तर कौशलकुमार व त्याचा सहकारी नवीनकुमार हा ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरला भेटण्यासाठी कमलापूर येथे त्याच्या घरी गेले.

दरम्यान कौशलकुमार हा न सांगता तिथून निघून गेला. मात्र ब-याच वेळापासून तो काही परत आला नाही. त्यामुळे त्यांनी ही घटना मालकाला सांगितली. सर्वांनी कौशलकुमारचा रात्री 1 वाजेपर्यंत शोध घेतला. मात्र तो आढळून आला नाही. दुस-या दिवशी शुक्रवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास अर्धवन ते कमलापूर रोडवर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. अपघातात त्याच्या चेह-याचा अर्धा भाग चाक गेल्याने चेंदामेंदा झाला होता. याची माहिती मालक व मजुराला देण्यात आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मालक व मजूर घटनास्थळी गेले असता तिथे त्यांना मृत इसम हा कौशलकुमार असल्याचे दिसले. घटनेची मुकुटबन पोलिसांना माहिती देण्यात आली. रात्री अज्ञात वाहनाने कौशलकुमारला जबर धडक दिल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. कौशलकुमारचा सहकारी नवीनकुमार यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालकाविरोधात बीएनएसच्या कलम 106(2) 281 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास मुकुटबन पोलीस करीत आहे.

Comments are closed.