विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी तालुक्यातील कायर येथील पशुवैद्यकीय उपचार केंद्रात शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांना लसीकरण आणि मार्गदर्शनाचा कार्यक्रम गुरुवारी आयोजित करण्यात आला. कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी धीरज पंढरीनाथ भोयर याने जनावरांना लसीकरण केले.
पावसाळ्यात जनावरांना घटसर्प, फाशी, एकटांग्या, सांसर्गिक गर्भपात आणि गोचीड, माशा आदी किटकांपासून आजरांची लागण होते. अनेक वेळा उपचाराअभावी जनावरे दगावतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. त्याअनुषंगाने कायरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मराटे, कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कायर येथे लसीकरण व मार्गदर्शनाचा कार्यक्रम राबविण्यात आला.
कृषी महाविद्यालय कोंघारा (केळापूर) चा विद्यार्थी धीरज पंढरीनाथ भोयर याने जनावरांना लसीकरण केले. जनावरांना होणाऱ्या आजारांची लक्षणे आणि तात्पुरता उपचार याविषयी माहिती दिली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी जनावरांना लसीकरण करून घेतले.