वाचन प्रेरणादिनानिमित्त वणीत विविध कार्यक्रम
वाचन, पाठांतर स्पर्धा आणि व्याखानाने रंगला कार्यक्रम
बहुगुणी डेस्क, वणी: भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणादिन म्हणून नगर वाचनालय वणी येथे विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने नगर वाचनालयात तीन सत्रांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. सकाळी 9 वाजता पहिल्या सत्रात कवी, निवेदक, मुक्तलेखक सुनील इंदुवामन ठाकरे यांनी गुंफले. त्यांचे ‘‘वाचाल तर वाचाल’’ या विषयावर व्याख्यान झाले. तर दुपारच्या सत्रांत वाचन व पाठांतर स्पर्धा झाली. सोबतच पांढरकवडा येथील विजय गोविंद देशपांडे यांचे व्याख्यान झाले.
वाचन स्पर्धेत एस.पी.एम. शाळेची मुलगी प्रेरणा कुळसंगे नगर परिषद शाळा क्र. 7 ची विद्यार्थिनी तनुश्री चिकटे, एस.पी.एम. ची विद्यार्थिनी मानसी डाहाळकर यांचा अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक आला. पाठांतर स्पर्धेत लायन्स इंग्लिश मेडीयमची स्वामींनी कुचनकर, नगर परिषद शाळा क्र. 5 ची त्रिरत्ना मजगवळी, एस.पी. एम.च्या गार्गी देशपांडे यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला.
‘वाचाल तर वाचाल’ या व्याख्यानात सुनील इंदुवामन ठाकरे म्हणाले की आपण जे वाचतो, ते आपल्या दैनंदिन जगण्यात जोपर्यंत उपयोगात येत नाही, तोपर्यंत त्या वाचनाला विशेष अर्थ राहत नाही. केवळ घोकंपट्टी किंवा औपचारिका म्हणून वाचणे हे निरर्थक असल्याचं ते म्हणाले. जगद्गुरू तुकोबारायांच्या ‘‘अर्थे विण पाठांतर कसे करावे ? व्यर्थ चि मरावे घोकुनिया’’ या अभंगाचा त्यांनी दाखला दिला. आपण जे वाचतो त्या अर्थ व उपयुक्तता आपण समजून घेऊन वाचन केले पाहिजे असेही ठाकरे म्हणाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कीर्ती देशकर होत्या. अतिथी म्हणून सुरेश देशकर, माधव सरपटवार उपस्थित होते.
दुपारच्या सत्रात विजय गोविंद देशपांडे यांचे व्याख्यान झाले. वाचन संस्कृती या विषयावर बोलताना ते म्हणाले की, आत्मविश्वास जागविण्यासाठी पुस्तकांची आवश्यकता आहे. पुस्तक आपल्याला आपल्या क्षमतांची व उणिवांची जाणीव करून देतो. वाचनाने दुसऱ्यांचे विचार ऐकण्याची क्षमता निर्माण होते. जीवन हे कल्पनेपेक्षा भयंकर आहे. त्यामुळे पुस्तक वाचनाने जगण्याची प्रेरणा निर्माण होते असे ही ते म्हणाले.
दुपारच्या सत्राचे प्रास्ताविक, संचालन वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले. आभार प्रमोद लोणारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी आनंद शोभने, देवपूजारी, देशमुख देवेंद्र भाजीपाले, राम मेंगावार यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात वणीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.