वसंत जिनिंगवर कासावारांचे विमान लँड, चुरशीच्या लढतीत परिवर्तन पॅनल विजयी

पहिल्या फेरीत पिछाडीवर गेलेल्या विमानाची अचानक दुस-या फेरीत झेप... ऍड. काळे व आ. बोदकुरवार यांना धोबीपछाड देत वामनराव कासावार विजयी...

जितेंद्र कोठारी, वणी: संपूर्ण उपविभागाचं लक्ष लागलेल्या वसंत जिनिंगच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा आज निकाल लागला. या निवडणुकीत माजी आमदार वामनराव कासावार यांच्या परिवर्तन पॅनलने बाजी मारत 17 पैकी 15 जागांवर विजय मिळवला आहे.  अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत  आधी ऍड काळे यांच्या जय सहकार पॅनलची छत्री समोर होती, तर दुस-या क्रमांकावर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या शेतकरी एकता पॅनलची कपबशी पुढे होती. विशेष म्हणजे पहिल्या 12 मतदान केंद्रावरील मतमोजणीत माजी आमदार वामनराव कासावार यांच्या परिवर्तन पॅनलचा एकही उमेदवाराला 1 हजारापेक्षा अधिक मत मिळवता आले नाही. मात्र दुस-या झरी आणि मारेगावच्या फेरीत विमानाने अशी झेप घेतली की याच्या हवेने छत्री उडाली व कपबशी जागीच फुटली. 17 पैकी 15 जागांवर विजय मिळवत वामनराव कासावार यांचे परिवर्तन पॅनलने स्पष्ट बहुमत मिळवले तर दोन जागा जिंकत जय सहकार पॅनलने आपले थोडे बहुत अस्तित्व टिकवून ठेवले आहे. विशेष म्हणजे किमान 2-3 जागा जिंकण्याची आशा असलेल्या आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या पॅनलच्या उमेदवारांना खाते ही उघडता आले नाही. त्यामुळे वसंतवर काँग्रेसचेच वर्चस्व राहणार हे निश्चित झाले आहे.

परिवर्तन पॅलनचे प्रकाश मॅकलवार व भूमारेड्डी बाजन्लावार या दोन उमेदवारांचा पराभव झाला तर जय सहकार पॅनलचे ऍड देविदास काळे व प्रशांत गोहोकार यांना विजय मिळवता आला. आधी दुस-या क्रमांकावर असलेल्या आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या शेतकरी एकता पॅनलचा नंतरच्या फेरीत सुपडा साफ झाला. या विजयाने परिसातील ऍड काळे यांचे सहकार क्षेत्रातील एकहाती वर्चस्वाला मोठा धक्का बसला आहे. तर या विजयाने ऍड देविदास काळे हे विधानसभेतील आपली दावेदारी पक्की करणार अशी चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात होती. मात्र या पराभवाने ऍड काळे यांच्या विधानसभेतील दावेदारीला चांगलाच धक्का बसला आहे.

वसंत जिनिंगच्या निवडणुकीत आजी-माजी आमदारांनी उडी घेतल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. कधी नव्हे ते या खेपेला मतदारांसह सर्वसामान्यांचे लक्ष वेधले होते. सकाळी 8 वाजता शेतकरी मंदीर येथे मतमोजणीच्या कार्याला सुरूवात झाली. मतमोजणीच्या ठिकाणी पॅनलच्या समर्थकांसह सर्वसामान्य नागरिकांनीही निकाल ऐकण्यासाठी एकच गर्दी केली होती. सुरुवातीला वणीतील 6 (3 शहर + 3 ग्रामीण) बुथवरील मतमोजणी पार पडली.

सर्वसाधारण गटातील 12 जागेसाठी झालेल्या मतदानात पहिल्या फेरीत ऍड काळे यांच्या जय सहकार पॅनलच्या 14 उमेदवारांनी 1 हजार पेक्षा अधिक मते घेतली. त्या पाठोपाठ शेतकरी एकता पॅनलच्या 8 उमेदवारांनी 1 हजार पेक्षा अधिक मते घेतली. सर्वसाधारण गटामध्ये कासावार यांच्या परिवर्तन पॅनलच्या एकाही उमेदवाराला 1 हजार पेक्षा अधिक मते घेता आले नाही. तर भाकप, शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड युतीचे उमेदवार व ज्यांच्या नेतृत्त्वात ही निवडणूक लढली गेली ते अनिल हेपट यांना अवघे 214 मत मिळाले.

पहिल्या फेरीत इतर मागासवर्गीय गटात जय सहकार पॅनलचे सुनिल वरारकर हे 1264 मते घेऊन आघाडीवर होते तर परिवर्तन पॅनलचे टिकाराम खाडे हे 1224 मते घेऊन दुस-या क्रमांकावर होते. कासावार गटाचे आशिष खुलसंगे यांना 1 हजार मते देखील मिळवता आले नाही. विशेष मागास प्रवर्गात (भटके विमुक्त) जागेवर जय सहकार पॅनलचे सुरेश बरडे हे 1305 मते घेऊन आघाडीवर होते तर परिवर्तन पॅनलचे महादेव चिडे हे 1193 मते घेऊन दुस-या क्रमांकावर होते. अनुसुचित जाती गटात नामदेव सुरपाम हे 1253 मते घेऊन आघाडीवर होते तर परिवर्तनचे अशोक वानखेडे हे 1198 मते घेऊन दुस-या क्रमांकावर होते. महिला गटात जय सहकार पॅनलच्या वंदना भोंगळे यांना 1225, तर जय सहकार पॅनलच्या मंदा पाचभाई यांना 1120 मते मिळाली. तिस-या क्रमांकावर परिवर्तनच्या संगिता काळे होत्या यांना 1033 मते मिळाली. विशेष म्हणजे यातही कासावार याच्या परिवर्तन पॅनलचे उमेदवार कुठेही नव्हते. 

झरी तालुक्यातील मतमोजणीत विमानाने घेतली झेप
वणी तालुक्यातील 12 मतदान केंद्रावरील मतमोजणीनंतर झरी आणि मारेगाव तालुक्यातील मतदान केंद्रावरील मतमोजणीला सुरूवात झाली. पहिल्या दोन पॅनलच्या जवळपास नसणा-या विमानाने या तालुक्यातील मतदानात अचानक झेप घेतली. पिछाडीवर असलेल्या कासावार यांच्या परिवर्तन पॅनलच्या विमानाने झेप घेत वणी तालुक्यातील झालेली पिछाडी झरी व मारेगाव तालुक्यात भरून काढली. त्यांनी ऍड काळे व आ. संजीवरेड्डी बोदुकरवार यांना धोबीपछाड देत अचानक मुसंडी मारत 17 पैकी 15 जागा जिंकल्या. तर काळे यांच्या पॅनलला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावे लागले. त्यांच्या पॅनलचे ऍड देविदास काळे व प्रशांत गोहोकार यांनाच विजय मिळवता आहे. त्यामुळे काळे यांनी पहिल्या फेरीत घेतलेल्या आघाडीचा आनंद केवळ काही क्षणाचा ठरला. 

विजयी उमेदवार व मत –  परिवर्तन पॅनल
वासेकर प्रमोद नत्थूजी – 2392
खाडे संजय रामचंद्र – 2376
आवारी पुरुषोत्तम केशव – 2455
वरहाटे शंकर राजेश्वरराव – 2295
आबड जयकुमार नेमीचंद – 2215
पावडे घनश्याम रामचंद्र – 2183
गोडे विनोद यशवंतराव – 2173
खापणे गजानन मारोती – 2189
धोबे अशोक दादाजी – 2299
धानोरकर रवींद्र रामचंद्र – 2260

नामाप्र
खुलसंगे आशिष आनंदराव – 2335

अनु. ज.
नागभीडकर अशोक सदाशिव – 2373

भ. वि. जा.
कोरडे राजेंद्र पुंडलिक – 2511

महिला राखीव
गोहोकार साधना जयसिंग – 2450
ठाकरे शारदा बाबाराव -2315

जय सहकार पॅनलचे ऍड देविदास काळे व प्रशांत गोहोकार विजयी (गट सर्वसाधारण)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.