दिग्गजांना मात देत आशिष खुलसंगे यांनी मारली बाजी….

पक्षश्रेष्ठींची तरुण नेतृत्वाला पसंती, वसंतच्या अध्यक्षपदी खुलसंगे तर उपाध्यक्षपदी जय आबड

जितेंद्र कोठारी, वणी: वसंत जिनिंगच्या अध्यक्षपदी आशिष खुलसंगे यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी जय आबड यांची वर्णी लागली आहे. वामनराव कासावार यांच्या परिवर्तन पॅनलने ऍड काळे यांच्या जय सहकार पॅनलचा धुव्वा उडवत 17 पैकी 15 जागांवर विजय मिळवला होता. तेव्हापासून अध्यक्षपदासाठी कुणाची वर्णी लागणार या चर्चेला उधाण आले होते. आज मंगळवारी वसंत जिनिंग सभागृहात माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात संचालक मंडळाची बैठक झाली. यात सर्वानुमते अध्यक्षपदी आशिष खुलसंगे व उपाध्यक्षपदी जय आबड यांची निवड करण्यात आली. काँग्रेसचे प्रमोद वासेकर, संजय खाडे, पुरुषोत्तम आवारी यांनी अध्यक्षपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती व त्यांचेच नाव चर्चेत होते. मात्र बैठकीत यांचे नाव मागे पडून यात आशिष खुलसंगे यांनी बाजी मारली.  

आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला चांगलेच महत्त्व आले होते. यात काँग्रेसचे दोन गट आमनेसामने आले होते. शिवाय आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी या निवडणुकीत उडी घेऊन निवडणूक आणखी अटीतटीची केली. आधी ऍड काळे यांचे पारडे जड असताना माजी आमदार वामनराव कासावार यांच्या पॅनलने अचानक मुसंडी मारली. तर ऍड काळे यांच्या पॅनलला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावे लागले.

तरुण नेतृत्त्वाला संधी…
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल याबाबत विविध तर्क लढवले जात होते. प्रमोद वासेकर, संजय खाडे, पुरुषोत्तम आवारी इत्यादी जाणत्या जुन्या व अनुभवी नेत्यांना मागे सारत पक्षश्रेष्ठींनी तरुण नेतृत्वावर विश्वास टाकत आशिष खुलसंगे यांच्या नावाला पसंती दिली. तर उपाध्यक्षपदी जय आबड यांना संधी दिली. तर मॅनेजिंग डायरक्टर म्हणून प्रा. डॉ. शंकर व-हाटे यांची वर्णी लागली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.