जब्बार चीनी, वणी: शहरात इतर सर्व व्यवसाय बंद असल्याने अनेकांनी भाजी विक्रीचा धंदा सुरू केला आहे. त्यामुळे प्रमुख चौकात भाजी विक्रेत्यांचीच गर्दी जास्त दिसत आहे. याबाबत नागरिकांनी सोशल मीडीयावरून प्रशासनावर रोष व्यक्त केल्यानंतर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर व ठाणेदार वैभव जाधव यांनी आज सकाळी बाजार परिसरात भेट दिली. तसेच गर्दी होणार नाही याचे नियोजन करत भाजी विक्रेत्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले.
सध्या लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे अनेक व्यवसाय बंद झाले. त्यामुळे मुजूर कारागिरांवर उपासमारीची वेळ आली. सध्या भाजी विक्रीला परवानगी असल्याने आधी भाजी व्यवसायात नसणा-या लोकांनीही आता नव्यानेच भाजी विक्री सुरू केली आहे. त्यामुळे चौकात आता भाजी विक्रेत्यांचीच गर्दी होत आहे.
आज वणीमध्ये प्रमुख चौकात भाजीच्या दुकानाची संख्या वाढल्याने दुकाने एकमेकांना खेटून लावण्यात आले होते. अनेकांनी तोंडाला रूमाल किंवा मास्क न लावताच विक्री व खरेदी करत असतानाचे चित्र दिसून येत होते.
दरम्यान या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज मुख्याधिकारी संदीप बोरकर व ठाणेदार वैभव जाधव यांनी संयुक्तरीत्या आपल्या कर्मचा-यांसह टीळक चौक, आंबेडकर चौक, जटाशंकर चौक इत्यादी ठिकाणी भेट देऊन भाजी विक्रेत्यांना उद्यापासून नेमून दिलेल्या जागेवरच बसून विक्री करण्याचे आदेश दिले. तसेच त्याबाबत नगर पालिका कार्यालयातून ओळखपत्र घेऊन जाण्याच्या सूचना केल्या.
ओळखपत्रासाठी नगर पालिकेत रांगा
मुख्याधिकारी यांनी ओळखपत्र अनिवार्य केल्याने नगर पालिकेत आज दुपारी ओळखपत्र काढण्यासाठी एकच झुंबड उडाली. सध्या जटाशंकर चौक 15, आंबेडकर चौक 15, टिळक चौक 20 व अन्य प्रमुख चौकात 5 ते 10 विक्रेत्यांनाच भाजीपाला विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यानिमित्ताने बाजारात गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.