पाणी वाटप करणा-या गाडीने एकाला उडवले

विवेक तोटेवार, वणी: शनिवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास शुद्ध पेयजल विकणाऱ्या गाडीने एका इसमाचा अपघात केला. या अपघातात इसमाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती आहे. पीडिताच्या साळ्याच्या तक्रारीवरून अज्ञात गाडी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सैय्यद इरफान अली सैय्यद सादिक अली (45) रा. मारेगाव येथील रहिवासी आहे. ते प्रवासी वाहन चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ते शनिवारी दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास आपल्या मालकीचे प्रवासी वाहन घेऊन वणीला चालकसोबत आले होते. ते नेहमीप्रमाणे वणीच्या बसस्थानक समोर चहा पिण्यासाठी थांबले.

दरम्यान चहा घेऊन रस्ता ओलांडत असताना अचानक पाणी वाटप करणा-या भरधाव वाहनाने (MH29 BE 5837) सैय्यद यांना धडक दिली. या अपघातात सैय्यद यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघात होताच धडक देणारा वाहन चालक घटनास्थळावरून गाडी घेऊन पसार झाला.

सैय्यद यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर पीडितांच्या साळ्याने वणी पोलिसात सदर वाहन चालकाबाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम 279, 337 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास दिगंबर किनाके करीत आहे.

भरधाव वाहनांवर कारवाई कधी?
शहरात दिवसभर पाणी विकणाऱ्या गाड्या फिरतात. यातील अनेक चालक हे भरधाव गाडी चालवतात. याशिवाय अनेक दुचाकीचालकही भरधाव गाडी चालवताना दिसतात. यात अनेक छोटे मोठे अपघात देखील होतात. मात्र त्यांच्यावर वाहतूक विभाग कारवाई करताना दिसून येत नाही. अशा भरधाव चालकावर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.