उपोषण मंडपात आमदार व काँग्रेस तालुका अध्यक्षांमध्ये शाब्दिक खडाजंगी
लेखी आश्वासनानंतर सुशिक्षीत बेरोजगार व प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची सांगता
सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथे खासगी सिमेंट व कोळसा कंपनीच्या विरोधात तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार व प्रकल्पग्रस्तांच्या मुलांचे 2 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू होते. गुरुवारी या उपोषणाची यशस्वी सांगता झाली. दरम्यान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आशिष खुलसंगे व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यात उपोषण मंडपातच चांगलीच शाब्दिक खडाजंगी रंगली. आमदार कंपनीची पाठराखण करीत असल्याचा आरोप करत आशिष खुलसंगे यांनी आंदोलकांची बाजू लावून धरली. अखेर आंदोलकांच्या अधिकाधिक मागण्या मान्य केल्यानंतर उपोषण सोडण्यात आले.
मुकुटबन येथील खासगी सिमेंट कंपनी व कोळसा खाणीत स्थानिक बेरोजगार व प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्यासाठी स्थानिक तरुणांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. या उपोषणाला सामाजिक संघटना व पक्षांनी देखील पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे प्रशासन हादरले होते. अखेर बीएस इस्पात व आरसीसीपीएल कंपनीला नमते घेत तरुणांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. याबाबत कंपनीकडून लेखी पत्र उपोषण मंडपात आणण्यापूर्वी भाजपचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार उपोषण मंडपात पोहोचले. त्याच वेळी काँग्रेसचे झरी तालुकाअध्यक्ष आशिष खुलसंगे हे देखील पदाधिका-यांसह तिथेच उपस्थित होते.
उपोषण मंडपात आमदारांनी नोकरीबाबत कंपनीच्या धोरणावर मत व्यक्त केले. सर्व गावातील तरुणांना नोकरीत सामावून घेणे शक्य नसून मुकुटबन, रुईकोट, भेंडाळा व अर्धवन या गावातीलच तरुणांना नोकरीत सामावून घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आशिष खुलसंगे हे चांगलेच भडकले. हा नियम तुम्ही बनवलाच कसा? असा जाब विचारत त्यांनी कंपनीच्या 10 किमी क्षेत्रात येणा-या गावातील अधिकाधिक सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी द्यावी अशी भूमिका घेतली. दरम्यान आमदार आणि काँग्रेस तालुका अध्यक्षांमध्ये चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली. खुलसंगे यांच्या मागणीला उपोषण कर्त्यांनीही पाठिंबा दिल्याने उपोषण मंडपातील वातावरण चांगलेच गरम झाले. दरम्यान आशिष खुलसंगे यांनी आमदारांवर विविध आरोपांच्या फैरी झाडल्या.
आमदारांकडून कंपनीची पाठराखण: आशिष खुलसंगे
कंपनीत स्थानिक तरुणांना रोजगार देण्याच्या संदर्भात आमदारांकडून स्थानिक बेरोजगारांची बाजू मांडणे अपेक्षीत होते. मात्र उपोषण मंडपात आमदार कंपनीची बाजू मांडत होते. शिवाय ते तरुणांच्या रोजगाराबाबत कोणतीही ठाम भूमिका घेत नव्हते. त्यांच्याकडून स्थानिक बेरोजगारांची समस्या सोडवणे अपेक्षीत होते मात्र आमदार साहेब कंपनीचे नियम, अटी सांगून कंपनीची बाजू लावून धरत होते. ही पाठराखण का? स्थानिक बेरोजगार युवकांची बाजू मांडायचे सोडून कंपनीची बाजू मांडणे हे संशयास्पद आहे.
– आशिष खुलसंगे, तालुका अध्यक्ष काँग्रेस
स्थानिकांना नोकरीत सामावण्यासाठी उपोषण सुरू असताना कंपनीतील प्रजापती नामक एका कर्मचा-याने बेरोजगार तरुणांना मारहाण करण्याची धमकी दिल्याने सदर आंदोलन चिघळले होते. सदर कर्मचा-याला कंपनीतून काढावे, 288 तरुणांना रोजगार द्यावा, अकुशल कामगारांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारावे इत्यादी मागण्या आंदोलकांच्या होत्या. दरम्यान तहसिलदार गिरीष जोशी, बीडीओ गजानन मुंडकर, ठाणेदार अजित जाधव, पीएसआय युवराज राठोड यांनी उपोषणकर्त्याना कंपनीद्वारे देण्यात आलेले लेखी आश्वासन सुपुर्द केले. त्यानंतर आंदोलकांनी उपोषण सोडले.
ऑगस्ट महिन्यात 20 स्थानिकांना, सप्टेंबर महिन्यात 10 स्थानिकांना व ऑक्टोबर महिन्यात 10 स्थानिकांनी असे 40 तरुणांना नोकरीत सामावून घेणार तर इतर 248 बेरोजगारांना जागा निघताच रोजगार दिला जाईल असे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. मात्र ही भरती करताना शिफारस पत्रानुसार आलेल्या उमेदवारांऐवजी आंदोलकांद्वारे जी गरजू बेरोजगारांची यादी दिली जाणार त्यांनाच रोजगार द्यावा, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. यावेळी उपोषण मंडपात जिल्हा बँकेचे संचालक राजू येल्टीवार, प्रवीण कासावार, संचालक सुनील ढाले, राहुल दांडेकर, ओम ठाकूर, वासूदेव विधाते, मंगेश पाचभाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
हे देखील वाचा: