सुशील ओझा, झरी:राज्य शासन व जिल्हा परिषदच्या अधिनस्त पशू संवर्धन विभागाची अवस्था वाईट झाली आहे. झरीसारख्या आदिवासी बहुल तालुक्यात पशुसंवर्धनची रुग्णालये सद्या डॉक्टराविना वाऱ्यावर पडली आहे. गाय, म्हैस वर्गीय प्राण्यांसह शेळ्या, मेंढ्या व कुक्कुट पक्षांच्याही उपचारचा प्रश्न या पशुपालकांमुळे उभा ठाकला आहे. पशू संवर्धन विभागात अन्य योजनांवर मार्जीनच्या दृष्टीने लक्ष ठेवणाऱ्या जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या तालुक्यातील पशू संवर्धनच्या रिक्तपदाचा विसर पडल्याने या भागातील पशू आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या पशू संवर्धन विभागाच्या कामकाजात सध्या प्रचंड अनागोंदी आहे. झरीसारख्या आदिवासी बहुल तालुक्यात या विभागाच्या आरोग्य सेवेचा लाभ पशुमालकांना आपल्या पशुंना देता येणे कठीण बनले आहे. तालुक्यात प्रथमश्रेणीचे तब्बल ११ पशू वैद्यकीय दवाखाने आहेत. त्यामध्ये झरी, मुकुटबन, पवनार, कमळवेल्ली, पाटणचा समावेश आहे. त्याचबरोबर एक फिरते पथकसुद्धा कार्यान्वित आहे.
द्वितीयश्रेणीमध्ये तालुक्यातील शिबला, गवारा, माथार्जुन, जाणोनी व अडेगावचा समावेश आहे. प्रथमश्रेणीतील पाटण दवाखान्यात डॉक्टर नियुक्त असले तरी उर्वरित पाच दवाखान्यांत डॉक्टर नाही. द्वितीयश्रेणीत अडेगाव येथे साहाय्यक पशुधन अधिकारी असून शिबला व जाणोनी या ठिकाणी डॉक्टरची पदे भरली आहे. गवारा व माथार्जुन येथील दोन्ही डॉक्टरची पदे रिक्त आहे. विशेष म्हणजे कमळवेल्ली प्रथमश्रेणीच्या दवाखान्यात डॉक्टर, चपराशी व अन्य कर्मचारी नसल्याने हा दवाखाना पूर्णत: बंद आहे. .
मुकुटबन येथे डॉ. देवकर म्हणून कार्यरत होते. त्यांची बदली झाल्यामुळे मुकुटबनचा पदभार वणी येथील एका डॉक्टरांकडे सोपविण्यात आला. परंतु काही दिवसांतच त्यांचीही बदली झाल्याने तेथील पद रिक्त आहे. पाटणचे डॉ. एम. एस. चव्हाण त्यांच्याकडे पाटण व्यतिरिक्त पाच दवाखान्यांचा प्रभार आहे. त्यामुळे त्यांचीही पशू उपचारादरम्यान दमछाक होते.
औषध पुरवठ्यातही सावळा गोंधळ
पशुवरील उपचारासाठी दरवर्षी कोट्यवधीची औषध खरेदी जिल्हास्तरावरू न पार पडते. मात्र तालुक्यातील पशू वैद्यकीय केंद्रांना होणाऱ्या औषध पुरवठ्यात प्रचंड सावळा गोंधळ आहे. तालुक्यात १०६ गावांतील पशुंच्या उपचारासाठी प्रथमश्रेणीचे ६, द्वितीयश्रेणीचे ५ असे ११ दवाखाने आहेत. मात्र सहाही दवाखान्यांचा कारभार प्रभारावर तर उर्वरित द्वितीयश्रेणीच्या दोन दवाखान्यांचा भार एकाच डॉक्टरवर पडला आहे. १५ दिवसांपूर्वी या केंद्रासाठी औषध पुरवठा झाल्याची माहिती आहे. मात्र, मोजकाच औषध पुरवठा झाल्याने पशुपालकांना आपली जनावरे इतरत्र उपचारासाठी न्यावी लागत आहे.