बहुगुणी डेस्क, वणी: येथील विदर्भ साहित्य संघ शाखा वणीच्या वतीने शाखेचा 65 वा वर्धापन दिन स्थानिक कवींचे कवि संमेलन घेऊन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक शाखेचे अध्यक्ष प्रा. दिलीप अलोणे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय कार्यकारिणी सदस्य माधव सरपटवार उपस्थित होते. यावेळी वणीतील विविध कवींनी त्यांची कविता सादर केली.
वर्धापन दिनानिमित्त आयोजित कवि संमेलनात येथील 18 कवींनी आपापल्या कविता सादर केल्या. त्यात सुहास लुथडे, डॉ. विकास जुनगरी, मीनाक्षी किलावत, शंकर घुगरे, मनोज बतरा, प्रा. नीता खामनकर, राकेश दिकोंडावार, रजनी पोयाम, अशोक आकुलकर, प्रीती दरेकर, प्रवीण सातपुते, सुप्रिया केदार, सरोज भंडारी, सागर बरशेट्टीवार, स्वप्ना पावडे, माधव सरपटवार, राजेश महाकुलकार, प्रा. दिलीप अलोणे यांनी एकापेक्षा एक सरस कविता सादर करून रसिकांची मने जिंकली.
वणी शाखेची स्थापना 15 जानेवारी 1954 रोजी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक म. ता. राजूरकर यांच्या पुढाकाराने झाली. तेव्हापासून सातत्याने ही शाखा सक्रिय राहिलेली आहे. या शाखेला 2017 चा उत्कृष्ट शाखेचा पुरस्कार मिळाला आहे. मागील वर्षी या शाखेने जिल्हा व विदर्भ साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले होते. विविध विषयावर व्याख्यान, परिसंवाद, कवि संमेलन इत्यादी उपक्रमाद्वारे साहित्य चळवळ राबविली जाते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखेचे उपाध्यक्ष गजानन कासावार यांनी केले. सूत्रसंचालन स्थानिक शाखेचे सहसचिव राजेश महाकुलकर यांनी केले. आभार प्रदर्शन सचिव अभिजित अणे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी नगर वाचनालयाचे देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार यांनी परिश्रम घेतले.
लिंकवर क्लिक करून पाहा कविसंमेलनाचा व्हिडीओ….