बहुगुणी डेस्क, वणी: विधानसभा निवडणूक जवळ येताच इच्छुक उमेदवारांच्या तिकीट मिळविण्याच्या प्रयत्नाला वेग आला आहे. राजकाऱणातील ज्येष्ठ असलेले व सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले विजय चोरडिया यांना आपला वणी विधानसभा मतदारसंघावर भाजपकडून दावा जाहीर केला आहे. ते जोमाने तयारीला लागले आहे व त्यासाठी त्यांनी मोर्चे बांधणी देखील सुरू केली आहे. शनिवारी दुपारी वणीतील श्री विनायक मंगल कार्यालय येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी मुक्त संवाद साधत उमेदवारीबाबत त्यांचा दावा जाहीर केला.
गेल्या दोन टर्मपासून वणी विधानसभा मतदारसंघात भाजपचा वरचष्मा राहिला आहे. 2019 च्या निवडणुकीत तर भाजपने प्रचंड बहुमताने विजय मिळवला होता. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत वणी विधानसभा मतदारसंघातून भाजपला मोठा फटका बसला. तर काँग्रेसला 57 हजारांपेक्षा अधिकची लीड मिळाली होती. ही लीड भाजपच्या जिव्हारी लागली. त्यामुळेच मतदारसंघात भाकरी फिरवण्याच्या चर्चेला वेग आला. याच पार्श्वभूमीवर भाजपमध्ये तिकीटासाठी रस्सीखेच वाढली आहे. यात आता विजय चोरडिया या ज्येष्ठ आणि दिग्गज नेत्याने उडी घेतल्याने तिकीटासाठीची रस्सीखेच रंगतदार झाली आहे.
विजय चोरडिया यांचा दावा किती मजबूत?
विजय चोरडिया हे वणी विधानसभा क्षेत्रात गेल्या 20 ते 22 वर्षांपासून कार्यरत आहेत. संपूर्ण वणी विधानसभा क्षेत्रात सातत्याने त्यांचे सामाजिक, धार्मिक व राजकीय उपक्रम सुरु असतात. त्याद्वारे त्यांचा तिन्ही तालुक्यात दांडगा जनसंपर्क जनसंपर्क स्थापित झाला आहे. विशेष म्हणजे सर्व जातीधर्माच्या कार्यक्रमांना त्यांची कायमच मदत असते.
विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक भागात विविध उपक्रम राबवून ते शेवटच्या टोकाच्या मतदारांपर्यंत पोहोचले आहेत. उत्तम जनसंपर्क व तरुणांची फौज त्यांच्या पाठिशी आहे. यासह आरएसएसचा देखील त्यांच्या नावाला समर्थन असल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्यांचा भाजपमध्ये दावा मजबूत असल्याचे दिसून येत आहे.
विजय चोरडिया यांचे कार्य
कामगारांच्या आदोलनापासून विजय चोरडिया यांच्या राजकारणाची सुरुवात झाली. त्यानंतर विविध उपक्रम, आंदोलन त्यांच्याद्वारे करण्यात आले आहे. आजपर्यंत अगणित आरोग्य शिबिराचे आयोजन त्यांनी केले. हजारो गंभीर रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी त्यांनी घेतली. शेकडो अपंगांना त्यांनी व्हिलचेअर वाटप केले. हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली. वणी विधानसभा क्षेत्रातील अनेक गावात त्यांच्या मदतीने वाचनालय व अभ्यासिका सुरु झाली आहे. पूरग्रस्तांना सर्व मदत त्यांनी केली आहे. खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी भव्य स्पर्धेचे आयोजन त्यांनी केले. याशिवाय सर्व धार्मिक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो.
यावेळी भाजपने तिकीट मिळाली तरच निवडणूक लढणार अशी माहिती देखील त्यांनी पत्रकारांना दिली. या कार्यक्रमाला बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, भाजपचे कार्यकर्ते, विजय चोरडिया यांचे समर्थक उपस्थित होते.
Comments are closed.