कुत्र्याला भगवे वस्त्र परिधान केल्याने वादंग
विजय चोरडिया यांनी व्यक्त केली दिलगिरी... कारस्थान रचणारे 'ते' पाच लोक कोण?
जितेंद्र कोठारी, वणी: रामनवमीच्या दिवशी आयोजित शोभायात्रेत विजय चोरडिया यांनी त्यांच्या घरातील कुत्र्याला भगवे वस्त्र परिधान केले होते. त्यामुळे सोशल मीडियातून त्यांच्यावर टीका सुरू होती. या प्रकरणी आज शनिवारी दिनांक 16 एप्रिल रोजी विजय चोरडिया यांनी घरी पत्रकार परिषद घेत या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करत या प्रकरणावर पडदा टाकला आहे. काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते व गुरुदेव सेनेने कुत्र्याला भगवे वस्त्र परिधान करण्याच्या कृतीवर आक्षेप घेतला होता. दरम्यान विजय चोरडिया यांनी माझ्याविरोधात हे कटकारस्थान असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला.
राम नवमीच्या दिवशी विजय चोरडिया यांनी आपल्या घरातील कुत्र्याला भगवे वस्त्र परिधान केले होते. भगवे वस्त्र परिधान केलेला कुत्रा घेऊन ते शोभायात्रेत सामिल झाले होते. दुस-या दिवशी सोशल मीडियातून याचे फोटो आणि व्हिडीओ टाकत काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला होता. दरम्यान याची बातमी एका रिजनल न्यूज चॅनलवर आली. या बातमीची लिंक दोन दिवसांपासून शहरातील विविध व्हॉट्स ऍप गृपवर व्हायरल होत होती. अखेर हे प्रकरण आणखी चिघळू नये तसेच प्रकरणाला वेगळा रंग दिला जात असल्याचे दिसताच विजय चोरडिया यांनी याबाबत आज पत्रकार परिषद आयोजित केली होती.
कुणाच्या भावना दुखवण्याचा हेतू नव्हता: विजय चोरडिया
कुत्रा जरी असला तरी आम्ही त्याला आमच्या घऱच्या सदस्यासारखे ठेवतो. सणाचा दिवस असल्याने कुटुंबातील व्यक्तीसह आम्ही कुत्र्याला देखील नवीन भगवे कपडे घालून दिले होते. कुत्रा हे खंडोबाचे रुप आहे. त्यामुळे कोणता कुत्सित भाव न ठेवता खंडोबाचा रूप म्हणून त्याला भगवे कपडे घातले होते. मी देखील त्या दिवशी भगवे वस्त्र घातले होते. याद्वारे कुणाच्या भावना दुखवण्याचा हेतू नव्हता. मात्र तरी देखील यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर याबाबत दिलगिरी व्यक्त करतो.
– विजय चोरडिया, अध्यक्ष, राम जन्मोत्सव समिती
कारस्थान रचणारे ‘ते’ पाच लोक कोण?
राम नवमी उत्सवा दरम्यान उत्सव समितीमध्ये दोन गट पडले होते. राम नवमी उत्सव जरी जल्लोषात आणि निर्विघ्ण पार पडला असला तरी या उत्सवाच्या नियोजनात अग्रेसर असलेल्या लोकांमध्ये दोन गट पडले होते. उत्सवाच्या आधी या गटातील कुरबुरी शहरात चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान या प्रकरणीही दोन गट पडले असल्याचे दिसून आले. विजय चोरडिया यांनी या प्रकरणी माझ्या विरोधात बदनामीचे कट कारस्थान 5 लोक करीत असल्याचा आरोप केला. त्यांनी या 5 व्यक्तींचे नाव जरी घेतले नसले तरी त्यांनी दुस-या गटातील लोकांकडे निशाना साधल्याची चर्चा सध्या रंगत आहे.
पत्रकार परिषदेत विजय चोरडिया यांनी आपल्या अनेक सामाजिक व धार्मिक कार्याचा संदर्भ दिला. तसेच आजपर्यंत निस्वास्थ भाव ठेवून सर्व कार्य केल्याचीही त्यांनी स्पष्ट केले. तुर्तास हा विषय थांबवावा अशी विनंती देखील त्यांनी केली. पत्रकार परिषदेत राजाभाऊ बिलोरिया, शाम भटगरे यांच्यासह शहरातील पत्रकार उपस्थित होते.
Comments are closed.