विजय चोरडिया यांच्यावर पक्षाने सोपवली नवीन जबाबदारी

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा सदस्य नोंदणी प्रमुखपदी नियुक्ती

बहुगुणी डेस्क, वणी: सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांच्याकडे आता पक्षाने संघटन बांधणीची जबाबदारी सोपवली आहे. त्यांची भाजपच्या वणी विधानसभा क्षेत्र सदस्य नोंदणी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निडवणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात भाजपतर्फे सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत यवतमाळ येथे जिल्हास्तरीय कार्यशाळा व बैठक पार पडली. या कार्यशाळेत त्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेला जिल्ह्यातील भाजपचे सर्व आमदार तसेच ज्येष्ठ नेते उपस्थित होते. कार्यशाळेत सदस्य नोंदणीबाबत चर्चा करण्यात आली. विजय चोरडिया यांचा शहरासह ग्रामीण भागात असलेला दांडगा जनसंपर्क याचा विचार करून त्यांना संपूर्ण मतदारसंघातील सदस्य नोंदणीची जबाबदारी देण्यात आली. विजय चोरडिया यांनी त्यांच्या निवडीचे श्रेय मा. खा. हंसराज अहीर यांना दिले आहे. निवडीबाबत त्यांनी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, कॅबिनेट मंत्री डॉ. अशोक उईक, आ. राजू तोडसाम, मदन येरावार, नितीन भुतडा इत्यादी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

सर्व जाती धर्माच्या लोकांना पक्षाशी जोडणार – विजय चोरडिया
लवकरच नगरपालिका व जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. विधानसभेत जरी पक्षाचा पराभव झाला असला तरी आगामी निवडणुकीत भाजप हा हिशेब बरोबर करणार. जिल्ह्यातील विविध जाती-धर्मातील लोकांना एकत्र घेऊन पक्ष संघटन मजबूत करण्यावर माझा भर राहील. महिला, दलित, आदिवासी, मुस्लिम समाजातील नवमतदारांना भाजपशी जोडण्याचे तसेच शेवटच्या टोकापर्यंत पक्ष संघटना पोहोचवण्याचे ध्येय राहणार आहे. पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो सार्थकी लावण्याचा अटोकाट प्रयत्न राहील.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

विजय चोरडिया हे ज्येष्ठ नेते असून त्यांचा राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे. याशिवाय एक सेवाभावी व्यक्ती व सामाजिक, धार्मिक कार्यात कायम अग्रेसर असणारे कार्यकर्ते अशी देखील त्यांची ओळख आहे. आरोग्य शिबिर व विविध धार्मिक, सामाजिक कार्यामुळे त्यांचा संपूर्ण वणी विधानसभा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. त्याचा पक्षाला नक्कीच फायदा होणार आहे. त्यांच्या निवडीबाबत मतदारसंघात समाधान व्यक्त केले जात आहे.

Comments are closed.