शिवसेनेचे तहसिल कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

व्यंकय्या नायडुंच्या 'त्या' वक्तव्याचा शिवसैनिकांकडून निषेध

0

जब्बार चीनी, वणी: राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेत “जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी” या खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या उच्याराला आक्षेप घेतल्याच्या निषेधार्थ वणीमध्ये आज शिवसेनेतर्फे निषेध करण्यात आला. तहसिल कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी व्यंकय्या नायडुंच्या बॅनरमधील प्रतिमेवर शाई फेकून निषेध नोंदवण्यात आला. माजी आमदार व शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आलं.

उदयनराजे भोसले यांनी राज्यसभा सदस्यत्त्वाची शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. यानंतर उदयनराजे भोसले कागदपत्रांवर स्वाक्षरी करत असताना सभापती व्यंकय्या नायडू यांनी म्हटले की, हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नसून माझ्या दालनात होत आहे. हे रेकॉर्डवरही घेतलं जात नाही. सभागृहात कोणत्याही घोषणा देण्यास परवानगी नाही. नवीन सदस्यांनी भविष्यात हे लक्षात ठेवावे. असे म्हटले होते. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याबाबत महाराष्ट्रभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत आज दुपारी वणीतही शिवसेनेतर्फे तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं.

व्यंकय्या नायडू व भाजपचा निषेध करण्यासाठी तसेच याबाबत माफी मागावी ही मागणी घेऊऩ दुपारी 3 वाजताच्या दरम्यान शिवसैनिक लाठीवाला पेट्रोलपम्प जवळ गोळा झालेत. इथे त्यांनी व्यंकय्या नायडू व केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ‘जय भवानी जय शिवाजी’ असा जयघोष केला. त्यानंतर आंदोलकांचा मोर्चा तहसिल कार्यालयावर गेला. तिथे मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत व्यंकय्या नायडूंनी राजीनामा द्यावा व भाजपने याबाबत माफी मागावी अशी मागणी केली.

हा छत्रपती शिवरायांचा अवमान – विश्वास नांदेकर
छ. शिवाजी महाराज भाजपला निवडणुकांपुरते हवे असतात, मात्र
छत्रपती शिवाजी महाराज आणि आई भवानीचे नाव घेतलेले यांना चालत नाही. भाजपचे शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम बेगडी आहे. छत्रपती शिवरायांचा उल्लेख करणे हे राज्यसभेत चालत नसेल तर हा शिवरायांचा अवमान आहे, ही भावना समस्त शिवप्रेमी शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली आहे. व्यंकय्या नायडू यांनी याबाबत त्वरित माफी मागून राजीनामा द्यावा. भविष्यात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही.
– विश्वास नांदेकर, जिल्हा प्रमुख शिवसेना

यावेळी गणपत लेडांगे, विक्रांत चचडा, रवि बोदेकर, महेश चौधरी, प्रशांत बलकी, बंटी येरणे, विक्की चवणे, कुणाल चहारे, विमलताई टोंगे, नंदाताई गुहे, नीलेश करडभुजे, आदेश कोंगरे, रुपेश चेंदे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.