माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

बहुगुणी डेस्क, वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे रविवारी रात्री निधन झाले. त्यांच्यावर गेल्या एक महिन्यांपासून मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होता. उपचारादरम्यान रात्री 11.05 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची वार्ता पोहोचताच वणीतील मान्यवरांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

विश्वास नांदेकर हे मुळात राजकारणी नाही तर शिक्षकी पेशातील होते. वेळाबाई येथील शाळेत ते शिक्षक होते. त्यांनी 30 वर्षांआधी राजकारणात प्रवेश केला. शिवसैनिक असलेले नांदेकर हे आक्रमक शैलीमुळे परिचित होते. आधी ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेत. त्यानंतर त्यांनी वणी विधानसभा निवडणुकीसाठी आपला मोर्चा वळवला. आक्रमकतेने ते सर्वसामान्यांचे, शेतक-यांचे प्रश्न मांडायचे. आक्रमक शैली व लढाऊ बाणा यामुळे ते अल्पावधीतच लोकप्रिय झाले. त्या काळात त्यांनी विविध सरकारी कार्यालयात केलेले आंदोलन चांगलेच गाजले होते.

त्यांची वाढती लोकप्रियता यामुळे शिवसेना पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत त्यांना उमेदवारी दिली. तब्बल 15 वर्षांनी त्यांनी काँग्रेसच्या विजयाला खंडार पाडत वणी विधानसभा क्षेत्रात त्यांनी शिवसेनेचा भगवा फडकवला. एक टर्म ते आमदार राहिले. मात्र त्यानंतर त्यांना यश मिळाले नाही. 2024 च्या निवडणुकीत त्यांना पक्षाने तिकीट नाकारले. त्यामुळे त्यांनी नाराज होत शिंदेसेनेत प्रवेश घेतला होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

एक आक्रमक आणि लढवय्या शिवसैनिक म्हणून ओळख असलेले विश्वास नांदेकर यांना काही काळापासून विविध व्याधींनी ग्रासले होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया कऱण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने एक महिन्याआधी त्यांना मुंबई येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते. दरम्यान तिथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली होती.

विश्वास नांदेकर यांच्या निधनाची वार्ता वणीत पोहोचताच राजकीय, सामाजिक क्षेत्रातून सहवेदना व्यक्त होत आहे. विश्वास नांदेकर यांचे पार्थिव वणी येथे आणले जाणार असून वणी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. पुढील अपडेट वाचकांना देण्यात येईल.   

Comments are closed.