भाजपच्या विजयाचा शिल्पकार कोण? का मिळालं बम्पर यश ?
जाणून घ्या भाजपच्या नगरपालिका निवडणुकीतील विजयाचे संपादक निकेश जिलठे यांचे विश्लेषण
निकेश जिलठे, वणी: वणी नगरपालिका निवडणुकीत भाजपला दणदणीत यश मिळाले आहे. गेल्या नगरपालिका निवडणुकीपेक्षा हे यश कमीच असले तरी तेव्हा भाजपचेच आमदार होते. राज्यात केंद्रात भाजपचीच सत्ता होती. मात्र यावेळी वणी विधानसभा क्षेत्रावर शिवसेना उबाठाचा भगवा फडकला आहे. एक नेतृत्त्व म्हणून आ. संजय देरकर समोर आले आहे. ऐन निवडणुकीच्या आधी विजय चोरडिया यांनी पक्ष सोडत शिंदे सेनेची वाट धरली होती. अँटी एन्कम्बसी, मत विभाजन, नगरपालिकेचा नवखा उमेदवार तसेच स्वबळ या परिस्थित भाजपला मिळालेले दणदणीत यश हे विरोधकांना गहन चिंतन करायला लावण्यासारखे आहे. भाजपला निवडणुकीत दणदणीत यश या मिळाले याचे विश्लेषण आपण आजच्या भागात करणार आहोत.
प्रचारात सुरुवातीपासूनच आघाडी
संपूर्ण निवडणूक काळात भाजपने शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण प्रचाराची धडाकेबाज मोहीम राबवली. उमेदवारांची घोषणा होताच प्रचाराला वेग आला आणि प्रत्येक प्रभागात पदयात्रा, कॉर्नर सभा, गृहभेटी तसेच कार्यकर्त्यांच्या बैठका यांचे काटेकोर नियोजन करण्यात आले. प्रचाराची जबाबदारी केवळ उमेदवारांपुरती मर्यादित न ठेवता वरिष्ठ नेते, प्रभारी आणि बूथस्तरीय कार्यकर्त्यांमध्ये विभागली गेली. त्यामुळे प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अधिक प्रभावी ठरला. मुद्देसूद प्रचार, कार्यकर्त्यांची अथक मेहनत, नेत्यांची सातत्यपूर्ण उपस्थिती आणि शेवटपर्यंत टिकवलेली प्रचाराची तीव्रता यामुळे भाजपने सुरुवातीपासूनच स्पष्ट आघाडी घेतली.
माजी आमदार बोदकुरवार यांचे नेतृत्व
माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे स्वत: लोकप्रिय असले तरी त्यांच्या नेतृत्त्वात भाजपला किती यश मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. संपूर्ण निवडणुकीत बोदकुरवार यांनी स्वत: निवडणुकीत उभे आहोत असे समजून उमेदवारांसाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यांनी स्वत: पायाला भिंगरी लावून उमेदवारांचा धुवाधार प्रचार केला. त्याला उत्तम नियोजनाची साथ लाभली. सकाळी व संध्याकाळी विविध पॉकेट्ससाठी बैठकींचे सत्र, तर दुपार ते संध्याकाळ पर्यंत पदयात्रा, गृहभेट याकडे लक्ष दिले. त्यांच्या या झपाटलेल्या कामगिरी व परिश्रमामुळे उमेदवारांचा आत्मविश्वास वाढला आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली. संपूर्ण निवडणुकीचे बोदकुरवार हे हिरो ठरले.
सहका-यांची दमदार साथ
केवळ एकट्या नेतृत्त्वाच्या जोरावर घवघवीत यश मिळू शकत नाही. पक्षातील अनुभवी तसेच दुस-या फळीतील नेत्यांची त्यांना दमदार साथ लाभली. प्रत्येक प्रभागाच्या प्रचारासाठी त्यांनी प्रभारीची नियुक्ती केली. या प्रभारींकडे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे प्रभारीची देखील प्रतिष्ठा पणाला लागली होती. प्रभारींनी निवडणूक काळात उमेदवारांना सर्वतोपरी मदत केली. प्रचार प्रभारी हा क्वचितच प्रभागाबाहेर दिसत होता. यातील अनेक प्रभारींनी निवडणूक जवळून पाहिली असल्याने त्याचा भाजपच्या उमेदवारांना मोठा फायदा झाला.
अखेरच्या क्षणी मुसंडी
प्रचाराच्या अखेरचा काळ हा भाजपसाठी महत्त्वाचा ठरला. अखेरच्या काळात मंत्री चंद्रशेखऱ बावनकुळे यांची जाहीर सभा व शक्तीप्रदर्शन रॅली याने मतदारांमध्ये विश्वास निर्माण केला. याचा फायदा भाजपच्या उमेदवारांना झाला. विशेष करून बावनकुळे यांनी मांडलेला पट्ट्यांचा विषय सर्वसामान्यांना आकर्षीत करून गेला. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या आत्राम या एक अपरिचीत उमेदवार होत्या. त्यामुळे सुरुवातीला काहीशा पिछाडीवर असलेल्या विद्या आत्राम यांनी जाहीर सभा, रॅली इत्यादींमुळे अखेरच्या क्षणी अचानक मुसंडी मारली. त्याचा फायदा नगरसेवक पदाच्या उमेदवारांना देखील झाला.
विकासाचे व्हिजन: ट्रिपल इंजिन
संपूर्ण निवडणूक काळात भाजपने प्रचारात जात, धर्म यावरचे राजकारण टाळून केवळ विकासाचे एक स्पष्ट आणि ठोस व्हिजन मतदारांसमोर मांडले. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने वणी शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे होतील, फंड आणता येईल हा प्रचार करण्यात भाजप यशस्वी झाला. शिवाय हे केवळ पोकळ दावे नव्हते, तर भाजपकडे केलेले विकास कामे मतदारांना दाखवण्यासाठी होती. याउलट फंड नसल्याने मतदारसंघात विकास खुंटला, हे सांगण्यातही भाजप यशस्वी झाला. ‘ट्रिपल इंजिन’ सरकारच्या माध्यमातून – केंद्र, राज्य आणि नगरपालिका – यात वणीच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास मतदारांमध्ये निर्माण झाला आणि मोठ्या संख्येने मतदारांचे मतपरिवर्तन झाले.
स्वबळावर लढल्याचा फायदा:
नगरपालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. ही बाब ओळखून भाजपने यावेळी स्वबळावर लढण्याचा धोका पत्करला, ज्याचा मोठा फायदा पक्षाला मिळाला. कोणताही कार्यकर्ता नाराज होऊ नये याची काळजी घेत अधिकाधिक कार्यकर्त्यांना उमेदवारीची संधी देण्यात आली, ज्यामुळे पक्षांतर्गत एकजूट मजबूत राहिली आणि प्रचाराला खंबीर बळ मिळाले. याउलट इतर पक्षांनी युती, आघाडी करून लढल्याने ज्या प्रभागांत कार्यकर्त्यांना तिकीट मिळाले नाही, तिथे बंडखोरी उफाळून आली आणि मतविभाजनाचा फटका बसला. स्वबळाच्या निर्णयाने प्रचारात एकसंघता दिसून आली आणि मतदारांनाही पक्षाची मजबुती जाणवली.
नवा गडी, नवा राज:
नगरपालिका निवडणुकीत अँटी-इन्कम्बन्सीचा सर्वाधिक फटका बसतो, ही बाब ओळखून भाजपने यावेळी रणनीतीत मोठा बदल केला. पक्षाने केवळ एक-दोन जुन्या उमेदवारांना संधी दिली, तर इतर सर्व प्रभागांत नवीन चेहऱ्यांना तिकीट देऊन ‘नवा गडी, नवा राज’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. या निर्णयाने मतदारांना परिवर्तनाची अपेक्षा पूर्ण झाली आणि पक्षाला जुन्या कामगिरीच्या ओझ्यापासून मुक्ती मिळाली. नवीन उमेदवारांची पाटी कोरी असल्याने मतदारांनी त्यांच्याबाबत सकारात्मक विचार केला – “जुने नगरसेवक काम करत नव्हते, नव्यांना संधी देऊन पाहू” अशी भावना मतदारांमध्ये प्रबळ झाली.
मीडियातून आघाडी: प्रचाराला प्रसिद्धीची साथ
निवडणुकीत मीडियाचा प्रभाव नाकारता येत नाही आणि भाजपने याचा पुरेपूर फायदा घेतला. स्थानिक न्यूज पोर्टल्स, यूट्यूब चॅनल, सोशल मीडिया इन्फ्लुएनसर, वृत्तपत्र यांचा भाजपने प्रभावी वापर केला. स्थानिक मीडियातून नियमित प्रसिद्धी मिळवून पक्षाने विकासकामांचा व उमेदवारांच्या वैयक्तिक ओळखीचा प्रचार केला. मुलाखत, रोजच्या प्रचाराची अपडेट, व्हिजन इत्यादी बातम्यांद्वारे मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्यात भाजपला यश मिळाले. भाजपच्या रॅली, कॉर्नर सभांना मीडियातून मोठे कव्हरेज मिळाले. ज्याने प्रचाराला व्यापक व्याप्ती दिली. जेव्हा केलेल्या प्रचाराची मीडियातून प्रसिद्धी मिळते, कामाची दखल घेतली जाते, याने प्रचार करणारा कार्यकर्ता देखील चार्ज होतो. मीडियातून मिळालेल्या आघाडीने प्रचाराला खरी गती मिळाली. आधी काहीसी पिछाडीवर असलेल्या भाजपने प्रचारात आघाडी घेतली व विजयाच्या मार्गाला बळकटी आली.
लाडक्या बहिणींची साथ
विधानसभा निवडणुकीत राज्यभर जशी लाडक्या बहिणींनी भाजपला निर्णायक साथ दिली होती, तशीच ठाम साथ यावेळी नगरपालिकेच्या निवडणुकीतही स्पष्टपणे दिसून आली. योजना बंद होण्याच्या भितीचा परिणाम म्हणून महिलांनी मोठ्या संख्येने भाजपला पसंती दिली. काही प्रभागात तर याच भितीतून प्रभागातील मतदान आवडीच्या उमेदवारांना तर नगराध्यक्षपदाचे मतदान भाजपला पडल्याचे बोलले जाते. घरखर्चाला हातभार लावणारी, महिलांना आर्थिक आत्मनिर्भरतेकडे नेणारी ही योजना भाजपच्या माध्यमातूनच सुरक्षित राहील, असा विश्वास मतदार महिलांमध्ये निर्माण झाला. परिणामी, शहरातील विविध प्रभागांमध्ये महिला मतदारांचा कल भाजपकडे झुकलेला दिसून आला आणि ‘लाडक्या बहिणींची साथ’ भाजपच्या विजयात महत्त्वाचा घटक ठरली.
भाग 2 व भाग 3, 4 खालील लिंकवर…
विजयापेक्षा पराभवाची चर्चा ! वणीमध्ये शिंदेसेना का अपयशी ठरली?



Comments are closed.