आई-बाबा, ताई-दादा ‘हे’ काम अजिबात विसरू नका

मतदान करा म्हणत शालेय विद्यार्थ्यांनी केली जनजागृती

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नेहमी आई-वडील किंवा ज्येष्ठ घरातल्या लहानग्यांना आठवण करून देत असतात. यावेळी हेच लहानगे मात्र आपल्या ज्येष्ठांना आठवण करून देण्यासाठी सरसावले आहेेत. चंद्रपूर- वणी लोकसभा मतदार संघाची सार्वत्रिक निवडणूक शुक्रवार दिनांक 19 एप्रिलला होत आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने दिशनिर्देश दिलेले आहेत, त्यानुसार वणी विधानसभा मतदार संघातील सर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी संकल्पपत्राद्वारे आपापल्या आई- वडिलांना मतदान कराच, अशी आर्त हाक दिली आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून 36 हजार विद्यार्थ्यांच्या घरातील आई- वडलांनी ‘आम्ही मतदान करूच’ असा संकल्प केला आहे. हा उपक्रम सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांच्या मार्गदर्शनात गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे यांनी राबविला.

‘ मतदान माझा अधिकार, मतदान माझं कर्तव्य’ या उपक्रमाअंतर्गत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. वणी विधानसभा मतदारसंघात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी संकल्पपत्राद्वारे आपल्या आई- वडिलांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांनी त्यात आवाहन केले की, प्रिय आई, बाबा माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण खूप मेहनत करत असता. देशातील लोकशाही मजबूत झाली, तरच माझे भविष्य उज्ज्वल होणार आहे. त्यामुळे मी तुम्हाकडून शुक्रवार दिनांक 19 एप्रिलला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत अवश्य मतदान करण्याचा संकल्प करण्याचा आग्रह करत आहे.

या आवाहनाला 36 हजार पालकांनी प्रतिसाद दिला. होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अवश्य मतदान करीन. सोबत मित्र, नातेवाईक व शेजारी यांनासुद्धा मतदान करण्यासाठी प्रेरित करणार असा निर्धार व्यक्त केला आहे. अशा विविध उपक्रमामुळे या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी नक्की वाढणार आहे.

Comments are closed.