50 लाख, 40 तोळे सोनं व आलिशान कार घेऊनही हुंड्यासाठी पत्नीचा छळ !

पत्नी व चिमुकलीला घराबाहेर हाकलून लावले गेटला कुलूप... क्लास वन ऑफिसरचे व्हाईट कॉलर प्रकरण

बहुगुणी डेस्क, वणी: पती शासकीय नोकरीत क्लास वन ऑफिसर… लाखोंचा पगार… लग्नात 20 लाख हुंडा, 40 तोळे सोनं आणि एक आलिशान कार… एवढे असूनही पत्नीला मारहाण व छळ करून सासरच्या मंडळींनी आणखी 30 लाख रुपये वसूल केले. पैशाच्या लालसेपायी तब्बल 50 लाख रुपये वसूल करूनही समाधान न झाल्याने पत्नी, लहान मुलीला मारहाण करीत घराबाहेर हाकलले, गेटला कुलपू लावले आणि जोपर्यंत पैसे आणत नाही तो पर्यंत घरी घेणार नाही अशी धमकी दिली. या व्हाईट कॉलर प्रकरणी मुकुटबन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पती, सासू, सासरे व दिरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

तक्रारीनुसार, फिर्यादी महिला निशा (नाव बदललेले) ही मुळची झरी तालुक्यातील रहिवासी असून तिचे सासर आदिलाबाद (तेलंगणा) आहे. तिचे पती एका शासकीय संस्थेत इंजिनियर आहे. सात वर्षापूर्वी निशाचा हिंदू रितीवाजाप्रमाणे विवाह झाला होता. मुलगा शासकीय नोकरीत क्लासवनच्या पोस्टवर असल्याने नव-या मुलाला लग्नात 20 लाख रुपये हुंडा, 40 तोळे सोनं व एक आलिशान कार देण्यात आली.

पतीची यवतमाळ येथे नोकरी असल्याने निशा ही सासरच्या मंडळीसह यवतमाळ येथे राहू लागली. मात्र काही दिवसातच निशाचा हुंड्यासाठी छळ सुरू झाला. पती, सासू आणि सासरे वारंवार पैसे मागत असे. तसेच निशाला मारहाणही करीत असे. त्यामुळे निशाने यवतमाळ पोलीस ठाण्यात आणि महिला आयोगाकडे पतीविरोधात तक्रारी दिल्या होत्या. प्रकरण समुपदेशनासाठी गेले. नुकतीच जन्मलेल्या मुलीचा विचार करून 2020 मध्ये त्यांच्यात समेट झाला. पतीने स्टॅम्प पेपरवर पत्नीला चांगली वागणूक देण्याचे लेखी आश्वासन दिले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मारहाणीचे मेडिकल रिपोर्ट
दरम्यान पतीची ट्रान्सफर झाल्याने निशा मुलीसह अदिलाबाद येथे सासरी आली. मात्र तिथेही निशाला सातत्याने छळ आणि मारहाण व्हायची. परदेशातील दिरही फोनवरून शिवीगाळ करत, तसेच भावाचे दुसरे लग्न लावण्याची धमकी देत असे. 2024 आणि 2025 मध्ये सासच्या मंडळींनी कलेल्या मारहाणीचे मेडिकल रिपोर्टही आहेत. दरम्यान सासरच्या मंडळींनी छळ व मारहाण करीत लग्नानंतर आणखी 30 लाख रुपये वसूल केले. असे तक्रारीत म्हटले आहे.

पत्नीला व चिमुकलीला काढले घराबाहेर 
गेल्या आठवड्यात म्हणजे 4 फेब्रुवारी रोजी सासरच्या मंडळींनी निशाला माहेरून पैसे आणण्यासाठी पाठवले. निशा माहेरी गेली. मात्र पैशाची जुळवाजुळव झाली नाही. ती रिकाम्या हाताने अदिलाबाद येथे घरी परतली. सासरच्या मंडळींनी पैशाबाबत विचारणा केली असता तिने पैशाची अरेंजमेंट झाली नसल्याचे सांगितले. त्यावर सासरची मंडळी चिडली व त्यांनी निशा आणि तिच्या मुलीला लाथाबुक्क्यांनी, केस ओढून मारहाण केली. घराबाहेर काढले आणि गेटला कुलूप लावले. निशाने 100 नंबरवर फोन केला व पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस घरी आले, ते कुलुप लावलेल्या गेटचे व घराचे फोटो घेऊन निघून गेले.

निशा माहेरी आली. तिने मारहाण, छळ व हुंड्याबाबत मुकुटबन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी निशाच्या पतीला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले. मात्र पती सातत्याने टाळाटाळ करीत होता. अखेर प्रकरण महिला समुपदेशन केंद्र पांढरकवडा येथे पाठवण्यात आले. मात्र स्टँप पेपरवर लिहून दिल्यावरही सासत्याने हुंड्यासाठी सासरी छळ होत असल्याचे सांगत तसेच तिच्या व मुलीच्या जीवाला धोका असल्याने सांगत निशाने पुन्हा समेट करण्यास नकार दिला.

कोणताही समेट न झाल्याने अखेर पोलिसांनी पती, सासू, सासरे व दिर या चौघांवर बीएनएसच्या कलम 115(2), 296, 3(5), 351(2), 352, 85 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास मुकुटबन पोलीस करीत आहे.

Comments are closed.