वणीत प्रतिबंधित तंबाखू विक्रेत्यावर धडक कारवाई, मोठा मासा जाळ्याबाहेर !

अवघ्या हजार रुपयांचा माल जप्त, पानटपऱ्या बंद… खर्रा शौकिनांचे वांदे!

विवेक तोटेवार, वणी: शहरात राजरोसपणे सुरु असलेला गुटखा–खर्र्याचा काळाबाजार अखेर पोलिसांच्या रडारवर आला आहे! वणी शहरात गुरुवारी पोलिस व अन्न सुरक्षा विभागाने टाकलेल्या अचानक धाडीमुळे अवैध विक्रेत्यांची झोप उडाली. शहरातील टिळक चौक, बसस्टँड, गांधी चौक ते वणी–यवतमाळ मार्गापर्यंत पथक फिरताच अनेक पानटपऱ्यांनी घाईघाईने शटर ओढले, तर एका दुकानातून प्रतिबंधित गुटख्याचा साठा थेट पोलिसांच्या हाती लागला. पोलीस प्रशासन व अन्न व औषध विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. जरी कारवाई झाली असली तर शहरातील मुख्य सप्लायर असलेला गुटखा व सुगंधीत तस्कर असलेला ‘दीपक’ मात्र हाती लागला नाही.  

फक्त एकावरच कारवाई
राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार टिळक चौक, बसस्टँड परिसर, गांधी चौक तसेच वणी–यवतमाळ रोडवरील दुकाने व पानटपऱ्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वणी–यवतमाळ मार्गावरील माऊली कोल्ड्रिंक अँड डेली नीड्स या दुकानात विविध कंपन्यांचे गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू विक्रीसाठी साठवून ठेवलेले आढळून आले. या कारवाईत सुमारे 600 ग्रॅमपेक्षा अधिक वजनाचा व अंदाजे 1 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. हा माल पुढील तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आला असून संबंधित विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पानटपऱ्या बंद… खर्रा शौकिनांचे वांदे!
वणी शहरात अचानक झालेल्या गुटखा-खर्र्यावरच्या धाडीनंतर शहरातील बहुतांश पानटपऱ्यांनी शटर ओढले. टिळक चौक, बसस्टँड परिसर, गांधी चौकसह मुख्य भागांमध्ये नेहमी गजबजलेल्या पानटपऱ्या दिवसभर बंद दिसून आल्या. नेहमी “एक खर्रा दे ना…” म्हणत रस्त्यावर थांबणारे ग्राहक खर्याच्या शोधात चक्क इकडून तिकडे फिरताना दिसत होते. तर काहींनी मुख्य रस्त्यावर नसलेल्या खर्रा मिळत असलेल्या किराणा दुकानाकडे धाव घेतली. पोलिसांच्या कारवाईची धास्ती असल्याने अनेक विक्रेत्यांनी माल लपवून ठेवला, तर काहींनी संपूर्ण दुकानच बंद ठेवले. परिणामी, शहरात खर्र्याच्या शोधात फिरणाऱ्या शौकिनांचे चांगलेच हाल झाले. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या प्रकरणी आरोपी विक्रेता अरुण शेलघरे (रा. तेली फैल, वणी) यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 तसेच नियम 2011 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल पाटील करीत आहेत. पोलिस प्रशासन व अन्न सुरक्षा विभागाने आवाहन केले आहे की, शहरात कुठेही प्रतिबंधित पदार्थांची विक्री होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तत्काळ प्रशासनाला कळवावे. 

Comments are closed.