वणी बहुगुणी बुलेटीन: 19 सप्टेंबर 2020
जाणून घ्या वणी, मारेगाव, झरी तालुक्यात दिवसभरात काय घडले?
आज दिवसभरात…. अर्थातच वणी बहुगुणी बुलेटीन…
आज कोरोनामुळे तिघांचा मृत्यू तर 36 पॉजिटिव्ह
जब्बार चीनी, वणी: आज शनिवारी दिनांक 19 सप्टेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे मृत्यूतांडव दिसून आले. आज 3 रुग्णांचा मृत्यू झाला तर 36 व्यक्ती पॉजिटिव्ह आले. आज आलेल्या रुग्णांमध्ये शहरात 24 रुग्ण आढळून आले आहेत. तर ग्रामीण भागात 12 रुग्ण आढळले. शहरात बेलदार पुरा येथे सर्वाधिक 8 त्यानंतर देशमुख वाडी येथे 6, सिंधी कॉलनी 4, टागौर चौक परिसर 3, सेवा नगर, गंगा विहार, शिवाजी चौक प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. ग्रामीण भागात राजूर येथे सर्वाधिक 4, वागदरा येथे 3 तर गणेशपूर 2 तर सुंदर नगर, भांदेवाडा, मांगरुळ येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. तर आज यवतमाळ येथे उपचार सुरू असलेल्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात वागदरा येथील एका 60 वर्षीय, राजूर येथील एका 47 वर्षीय तर शहरातील एका 74 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे.
स्थानिकांचा लोढा हॉस्पिटलवर धावा, विरोधामुळे काम थांबवले
जब्बार चीनी, वणी: डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलचे प्रकरण आता चांगलेच नाट्यमय वळण घेत आहे. स्थानिक नगरसेवकाच्या नेतृत्वात आज शेकडो लोकांनी लोढा हॉस्पिटलवर धावा बोलला व तिथे सुरू असलेले काम थांबवले. दरम्यान जोपर्यंत प्रशासन सुरक्षा देत नाही तो पर्यंत काम सुरू करणार नाही असा पवित्रा लोढा हॉस्पिटलचे संचालक डॉ. महेंद्र लोढा यांनी घेतला. त्यामुळे वणीत डेडिकेटेड कोविड रुग्णालय आता होणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
अर्जुनी, मांगरुळ, सगणापूर येथे कोरोनाची एन्ट्री
नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढतच चालला आहे. आज शनिवारी दिनांक 19 सप्टेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील आहे. आज अर्जुनी येथील 1 महिला व 2 पुरुष, मांगरुळ येथील 2 महिला तर सगणापूर येथील 1 पुरुष असे एकूण 6 पॉझिटिव्ह आले आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना ट्रेस करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यांच्या घराचा परिसर सील करण्यात आला आहे. सध्या मारेगाव तालुक्यात एकूण 46 पॉजिटिव्ह रुग्ण झाले असून यातील 27 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, यातील 19 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत.
तेजापूर परिसरात दारूची अवैधरित्या विक्री
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तेजापूर इथे खुलेआम अवैध दारूची विक्री जोमात सुरू आहे. याकडे पोलीसविभागाचे दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी यावर कोणतीच कारवाई नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येथे दारूची चढ्या दराने विक्री होते. दारूविक्रेत्यांमध्ये कदाचित व्यावसायिक स्पर्धादेखील असावी. गोरगरीब जनता व्यसनांच्या नादी लागत आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत आहे. ही चिंतेची बाब आहे. गावातील प्रतिष्ठित व काही महिला पोलीस स्टेशनवर धडकणार असल्याची माहिती आहे.
गाडी चोरास अटक, डीबी पथकाची कारवाई
विवेक तोटेवार, वणी: तो चोरलेली गाडी घेऊन उभा होता. त्याला पुढे काय होईल याची तीळमात्रही कल्पना नव्हाती. एका बेसावधवेळी अचानक पोलीस आलेत. त्याला गाडीसहीत ताब्यात घेतले. गाडी चोरणाऱ्याच्या हातात बेड्या पडल्यात. छोरीया ले आऊट येथून 2 सप्टेंबर रोजी एक दुचाकी चोरी गेली. याबाबतची तक्रार 11 सप्टेंबर रोजी वणी पोलिसात देण्यात आली होती. पोलिसांनी 18 सप्टेंबर रोजी घोन्सा चौफुली येथून आरोपी सौरभ घनश्याम भटवलकर (21) रा. सेवानगर यास अटक करीत दुचाकी ताब्यात घेतली. सदर कारवाई उपविभागीय अधिकारी व ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने केली.
ट्रामा सेंटरमध्ये योग्य ती सुविधा द्या: आ. बोदकुरवार
जब्बार चीनी, वणी: कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि वाढता मृत्यूदराने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. परसोडा येथील कोविड केअर सेंटर येथील गैरसोयीबाबत रुग्णांच्या चांगल्याच तक्रारी वाढल्यास आहे. त्यातच ग्रामीण रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटर येथे नवीन कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहे. दरम्यान प्रधानमंत्री खनिज विकास निधी अंतर्गत वणी येथील ग्रामीण रूग्णालयातील ट्रामा केअर इमारतीमध्ये आक्सिजन, व्हेन्टीलेटर, बेड व डॉक्टर यांची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी जिल्हाधिका-यांना पत्र दिले आहे.
वाघाच्या हल्यात शेतात काम करणारी महिला ठार
अयाज शेख, पांढरकवडा: तालुक्यातील अंधारवाडी येथे वाघाच्या हल्ल्यात महिला ठार घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे. लक्ष्मी दडांजे असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे . ही महिला शेतात निंदण करीत असताना वाघाने तिच्यावर हल्ला केला. या तिचा जागेवरच मृत्यू झाला. अंधारवाडी, वारा कवठा या भागात अनेकवेळी वाघाचा वावर आहे. अनेकांना या भागात वाघाचे दर्शन झाले आहे. या पूर्वीही या भागात वाघाने मनुष्यावर हल्ले केले आहे.
एका महिन्यातच रस्त्याची ‘वाट’ लागली
विवेक तोटेवार, वणी: येथील सदाशिवनगरात रस्त्याच्या मधोमध नालीवरती काही दिवसांपूर्वी रपट्याचे झाले.अतीशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम असलेला रपटा एक महिना होण्याआधीच फुटला. एका महिन्यातच या रस्त्याची ‘वाट’ लागली. त्यामुळे आय. एस. ओ नामांकन प्राप्त चिखलगाव ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार पुन्हा ‘रस्त्यावर’ आला. या रस्तावरुन सारखी वर्दळ सुरु असते. कारण येथून केवळ काही अंतरावरच एक मोठे हॉस्पीटल आहे. या फुटलेल्या रपट्यामुळे एखादा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. एखाद्या निष्पाप व्यक्तीचा यात जीवसुध्दा जाऊ शकतो. याला जवाबदार कोण राहतील अशी येथील ग्रामस्थांची ओरड आहे.
जनता कर्फ्यूत देशी दारुचे दुकाने सुरू असल्याने संताप व्यक्त
नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असल्याने मारेगावातील व्यापारी आणि प्रतिष्ठीत लोकांनी एकत्र येत 4 दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला. आज या जनता कर्फ्यूचा तिसरा दिवस आहे. एकीकडे या कर्फ्यूला 100 टक्के प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे देशी दारूच्या दुकानदारांनी या कर्फ्यूला साथ न दिल्याने कर्फ्यूच्या उद्देशाला हरताळ फासला गेला आहे. शहरातील असलेले चारही देशी दारूचे दुकानं सुरू आहे. परिणामी कर्फ्यूचा उद्देश सफल न होत असल्याने सर्वसामान्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
युवासेना युवतीसेनेत युवकांची इनकमींग सुरूच
विवेक पिदुरकार, वणी: शनिवारी १९ सप्टेंबर रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वासभाऊ नांदेकर आणि युवासेना विस्तारक दिलीपदादा घुगे यांच्या मार्गदर्शनात युवासेना यवतमाळ जिल्हाप्रमुख विक्रांत चचडा यांचा कार्याला प्रेरीत होऊन वणी तालुक्यामधील काही युवकांचा युवासेनामध्ये शिवबंधन बांधून प्रवेश झाला. काही युवतींचा युवतीसेनेत शिवबंधन बांधून प्रवेश झाला.
कमळवेल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा
सुशील ओझा, झरी: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस तालुक्यातील कमळवेल्ली शाखेने उत्साहात साजरा केला. भाजपाच्या स्थानिक शाखेने हे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण केले. मोदींनी देशात विकासाचे रोप लावले. त्याचंच प्रतीक म्हणून वृक्षारोपण करीत असल्याचं भाजपा पदाधिकाऱ्यांनी म्हटलं.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)