वणी बहुगुणी बुलेटीन: 23 सप्टेंबर 2020

जाणून घ्या वणी, मारेगाव, झरी तालुक्यात दिवसभरात काय घडले?

0

आज दिवसभरात…. अर्थातच वणी बहुगुणी बुलेटीन… 23 सप्टेंबर 2020

आज वणीत कोरोनाचे 13 रुग्ण
जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी दिनांक 23 सप्टेंबर रोजी तालुक्यात 13 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांमधले सर्व व्यक्ती या आरटी पीसीआर टेस्ट नुसार पॉजिटिव्ह आल्या आहेत. आजच्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाची एकूण रुग्णांची संख्या 577 झाली आहे. आज शहरातील आनंद नगर, सावरकर चौक येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. तर ड्रिमलॅन्ड सिटी येथे 3 रुग्ण आढळले आहे. तर ग्रामीण भागात कुंभारखनी येथे 2, भालर येथे 2, ब्राह्मणी. चिखलगाव, राजूर. सोमनाळा येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.

अखेर हल्लेखोर वाघिण जेरबंद, रॅपिड रेस्क्यू टीमची कार्यवाही
अयाज शेख, पांढरकवडा: तालुक्यातील अंधारवाडी परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून धुमाकुळ घालणा-या वाघिणीला अखेर आज दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी जेरबंद करण्यात आले. बोरी परिसरात या वाघिणीला वनविभागाच्या मदतीने अमरावती येथील रॅपिड रेस्क्यू टीमने पकडून बंदीस्त केले आहे. या वाघिणीच्या हल्ल्यात अंधारवाडी परिसरातील एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर एका शेतक-याला जखमी केले होते. याशिवाय या वाघिणीने अनेक जनावरांचाही फडशा पाडला होता. हल्लेखोर वाघिण जेरबंद झाल्याने कळताच परिसरात एकच जल्लोष करण्यात आला आहे.

मारेगाव तालुक्यात पुन्हा दोन पॉझिटिव्ह
नागेश रायपुरे, मारेगाव : आरोग्यविभागाला 23 सप्टेंबर 2020ला अहवाल मिळाला. त्या अहवालानुसार तालुक्यात बुधवारी पुन्हा 2 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. यात मांगरूळ, सगणापूर या दोन गावाचा समावेश आहे. तालुक्यात आता ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 17 आहे. मांगरूळ, सगणापूर या गावात आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्तीना ट्रेस करणे व त्यांचे घराचा परिसर सील करण्याची प्रक्रिया चालू आहे. अलीकडे झालेल्या जनता कर्फ्यूबाबत लोक सकारात्मक आहेत. यातून काही चांगले रिझल्ट्स मिळतील अशी त्यांनी अपेक्षा आहे.

चोरींवरचे सुटले कंट्रोल, गायब होत आहे पेट्रोल
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन, मांगली व परिसरात लहान मोठ्या चोरीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने जनतेत दहशीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातही गाड्यांमधील पेट्रोलचोरींचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. मुकुटबन येथील वॉर्ड क्रं ४ मधील रहिवासी दयाकर येनगंटीवार यांच्या घराच्या वॉल कंपाउंडमध्ये ठेवलेल्या दुचाकीतील पेट्रोल काही तरुण काढत होते. दयाकर यांची झोप उघडली व दरवाजा उघडून बाहेर आले. दयाकर यांना दोन तरुण दुचाकीजवळून पळून गेले. मात्र त्यांच्या गाडीतील पेट्रोल चोरट्यानी काढल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

सततच्या पावसानं उभ्या पिकांना फुटले अंकुर
विलास ताजने, वणी: खरीप पिकांचा हंगाम काढणीच्या टप्प्यात आहे. उत्तरा नक्षत्रात सतत पडत असलेल्या पावसाने खरीप पिके उद्ध्वस्त झालीत. पेरणीपासून खरीप पिकांना पोषक पाऊस पडत होता. वेळच्यावेळी होणाऱ्या योग्य व्यवस्थापणामुळे कापूस, सोयाबीन, तूर आदी पिके चांगलेच बहरले होती. कापूस, सोयाबीन पिकांना फळधारणाही समाधानकारक झाली. परंतु उत्तरा नक्षत्रात पडत असलेल्या लहरी पावसाने जूनच्या पहील्या पंधरवड्यात पेरणी झालेल्या खरीप पिकांची प्रचंड हानी झाली आहे.

कत्तलीसाठी घेऊन जाणा-या 19 म्हैस व रेड्यांची सुटका
विवेक तोटेवार, वणी: वणीतून नेर येथे पिकअप वाहनाने कत्तलीसाठी घेऊन जाणा-या 19 म्हैस व रेड्यांची वणी पोलिसांनी सुटका केली आहे. या प्रकरणी चार वाहने जप्त करण्यात आली असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चार पिकअप वाहने ज्याची अंदाजे किंमत 18 लाख रुपये. 19 म्हैस व रेडा किंमत 3 लाख 80 हजार रुपये असा एकूण 21 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व आरोपी हे वणी शहरातील रहिवाशी आहेत.

वन्यप्राण्यांकडून कपाशी पिकाची नासधूस
नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील बोरी (गदाजी) येथील एका शेतकऱ्याच्या शेतात रानडुक्कर या वन्यप्राण्यांनी कपाशी या पिकाची नासधूस केली आहे. यामुळे संभाजी डोमाजी बेंडे या शेतकऱ्याचे जवळपास 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमवारी 21 सप्टेंबर रोजी या शेतकऱ्याच्या शेतातील कपाशीच्या जवळपास 200 ते 300 रोपट्यांची रानडुकरांनी नासधूस केली. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची त्यांनी मागणी केली आहे.

मोकाट गायीवर उपचार करून दिला मानवतेचा परिचय
विवेक तोटेवार, वणी: शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांना अपघात किंवा इतर आजाराने मृत्यूला समोर जावे लागते. अशाच एका गायीच्या पायाला जखम झाली असताना युवसेनच्या कार्यकर्त्यांनी गायीला ताब्यात घेतले व पशुचिकित्सकांना बोलवून त्यांच्याकडून उपचार करीत मानवतेचा परिचय दिला आहे. सोमवारी सायंकाळी शहरातील टिळक चौक परिसरात एक गाय जखमी अवस्थेत फिरत होती. ही बाब माळीपुऱ्यात राहणाऱ्या काही युवकांच्या निदर्शनास आली. त्यांनी त्या गाईला पकडले व मंगळवारी सायंकाळी पशुचिकित्सक डॉ. जाधव यांच्याकडून त्या गायीवर उपचार केला.

येदलापूर येथील कंत्राटदाराला 92 हजारांचा दंड
सुशील ओझा, झरी: जिल्हा परिषदेच्या बांधकामासाठी अवैधरित्या रेतीसाठा केल्याप्रकरणी येदलापूर येथील कंत्राटदाराला 92 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सदर कार्यवाही तहसिलदार झरी यांनी केली आहे. या अवैध रेतीसाठयाबाबत शिवसेना जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विश्वास नादेंकर यांच्या नेतृत्वात तालुकाध्यक्ष चंद्रकांत घुगुल यांनी वारिष्ठांकडे तक्रार करण्यात आली होती.

ऑनलाईन अभ्यासाच्या नावावर विद्यार्थी गेम्सच्या नादात !
विलास ताजने, वणी: ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी बहुतांश पालकांनी मुलांना स्मार्ट फोन घेऊन दिले. मात्र विद्यार्थी ऑनलाईन अभ्यासात कमी आणि मोबाईल गेममध्ये अधिक वेळ गुंतून असल्याचे दिसून येत आहे. याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीवर होऊ शकतो. म्हणून पालकांनी वेळीच सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे. या स्मार्ट फोन्सच्या दरुपयोगाने विद्यार्थ्यांच्याच भविष्याचा ‘गेम’ होईल काय अशी स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पालकांनी सावध होण्याची गरज आहे.

शनिवारपासून वणीतील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल होणार सुरू
जब्बार चीनी, वणी: वणीतील लोढा हॉस्पिटलला जिल्हाधिकारी यांनी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल घोषीत केले होते. त्यानुसार सामान्य हॉस्पिटलला डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. अखेर हॉस्पिटलचे काम पूर्ण झाले असून शनिवारी दिनांक 26 सप्टेंबरपासून परिसरातील कोविड रुग्णांना इथे उपचार घेता येणार आहे. इथे 50 बे़डचे अत्याधुनिक व सर्व सेवा सुविधायुक्त कोविड हॉस्पिटल तयार करण्यात आले आहे. या हॉस्पिटलमध्ये पॉजिटिव्ह रुग्णांना सामान्य उपचारापासून ते शस्त्रक्रियेपर्यंत सर्व सोयी सुविधा पुरवल्या जाणार आहेत.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.