बस स्टँडवरून मोबाईल लंपास करणारे चोरटे गजाआड
चोरीचे 2 मोबाईल जप्त, वणी पोलिसांची 'क्वीक' कारवाई
बहुगुणी डेस्क, वणी: वणी बस स्थानकावरून बसमध्ये चढणा-या 2 प्रवाशांचे मोबाईल चोरीला गेले होते. या प्रकरणी वणी पोलिसांनी दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. समीर साबीर पठाण (19) आणि अर्जून गोपाल आडे (30) दोघेही रा. रंगनाथ नगर वणी असे अटक करण्यात आलेल्या संशयीतांचे नावे आहेत. मोबाईल चोरी झाल्यानंतर प्रवाशांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रार प्राप्त होताच अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी चोरट्यांना गजाआड केल्याने वणी पोलिसांचे कौतुक होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी राहुल कुभेकर (वय 55, रा. राजूर कॉलरी, वणी) आणि बजरंग विठ्ठल परबत (वय 32, रा. निजामपूर, ता. रिसोड, जि. वाशिम) हे बस स्टँडवर आले होते. ते चंद्रपूरला जाणारी बस पकडत होते. दरम्यान गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी या दोन प्रवाशांचा मोबाईल लंपास केला होता. फिर्यादींनी परिसरात मोबाईलचा शोध घेतला. कॉल केला मात्र त्यांचा मोबाईल स्विच्ड ऑफ दाखवत होता. अखेर या दोन्ही प्रवाशांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी सूत्र हलवले. खब-यांना ऍक्टिव्ह केले. दरम्यान त्यांना एका खबरीकडून त्यांना चोरट्यांची माहिती मिळाली. त्यांनी माहितीच्या आधारे दीपक चौपाटी येथून समीर साबीर पठाण (वय 19, रा. रंगनाथ नगर, वणी) आणि अर्जून गोपाल आडे (वय 30, रा. रंगनाथ नगर, वणी) या 2 संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे चोरीला गेलेले दोन्ही मोबाईल आढळून आले. यातील एक फोन XIAOMI तर दुसरा फोन VIVO कंपनीचा होता.

अवघ्या 2 तासांत कारवाई
गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या 2 तासांत पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत करून 2 संशयितांना ताब्यात घेतले. या यशस्वी कारवाईमुळे वणी परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे. मोबाईल सह दुचाकी व घरफोडी करणा-या चोरट्यांचाही पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा वणीकर व्यक्त करीत आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सूरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गोपाल उंबरकर आणि डी.बी. पथकातील पोलीस उपनिरीक्षक धीरज गूल्हाने, पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद वसीम, मोनेश्वर खंडरे, गणेश मेश्राम, नंदकुमार पूप्पलवार, गजानन कुडमेथे यांनी पार पाडली.



Comments are closed.