दारूच्या नशेत वडिलांवर काठीने हल्ला, वडील गंभीर जखमी

मारहाण करणाऱ्या मुलावर गुन्हा दाखल केला

बहुगुणी डेस्क, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील कोसारा गावात दारूच्या नशेत मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांवर काठीने हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत असून, मारेगाव पोलिसांनी आरोपी मुलावर गुन्हा दाखल केला आहे.

जखमी झालेले वडील परमेश्वर कवडुजी थोरात (वय 52, रा. कोसारा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा अनिकेत परमेश्वर थोरात (वय 24) दारूच्या नशेत घरी आला आणि विनाकारण शिवीगाळ करू लागला. वडिलांनी त्याला शिवीगाळ का करतोस, असे विचारले असता, संतापलेल्या अनिकेतने घरातील वेळवाची काठी उचलून वडिलांना बेदम मारहाण केली.

या हल्ल्यात परमेश्वर थोरात यांच्या पाठीला, दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली असून, उजव्या हाताच्या अंगठ्याजवळील पंजा चिरला गेला आहे. तसेच अनिकेतने वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या घटनेची तक्रार मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली. पोलिसांनी परमेश्वर थोरात यांची वैद्यकीय तपासणी करून आरोपी अनिकेतवर बीएनएसच्या कलम 118(1), 351(2), 351(3) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.

Comments are closed.