जितेंद्र कोठारी, वणी: प्लास्टिक कॅरीबेग, खर्रा पन्नी, थर्माकॉल व प्लॅस्टिकच्या पत्रावळी, ग्लास वाट्याच्या अतोनात वापरामुळे वायू व जल प्रदूषणात भरमसाट वाढ झाली. याचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावर झाला. अशा कारणांमुळे राज्य शासनाने 23 जून 2018 रोजी संपूर्ण राज्यात प्लास्टिक आणि थर्मोकॉल उत्पादन (निर्माण, वापर, विक्री, वाहतुक आणि साठवणूक) यावर बंदी लावली आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेनी नेमलेल्या भरारी पथकाने काही दिवस किरकोळ दुकाने तसेच फळ, भाजी विक्रेत्यांकडून पातळ कॅरीबॅग जप्त करून आपले कर्तव्य पार पाडल्याचे दिसत आहे. सद्य:स्थित संपूर्ण वणी शहरात परत एकदा प्लास्टिक कचऱ्याचे ढिगारे दिसायला लागले आहे.
प्लास्टिक बंदीनंतर फळ, भाजी व इतर किरकोळ समानासाठी बहुतांश नागरिक बाजारात जाताना कापडी पिशवी घेऊन जाताना दिसत होते. गुटखा बंदी कायदयाप्रमाणे प्लास्टिक बंदी कायद्याचा असर काही दिवस जाणविला. प्लास्टिक बंदीची मोहीम थंडावताच प्लास्टिक व थर्मोकॉल ठोक विक्रेत्यांनी आपल्या गुप्त गोडावूनमध्ये दडवून ठेवलेला लाखो रुपयांचा माल हळू हळू बाहेर काढण्यास सुरूवात केली आहे.
नगर परिषदेच्या मुख्यदारासमोर बसलेले भाजी व फळ विक्रेते आपल्या खिशात 50 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबेग लपवून ग्राहकांना देत आहे. शहरात प्लास्टिक व खर्रापन्नी तसेच डिस्पोजेबलच्या नावावर कधीच नष्ट न होणारे थर्माकॉल ताट, वाटी, गिलासचे घाऊक व किरकोळ विक्रेते कोण आहे, त्यांचे गोडाऊन कुठे आहे याची माहिती नगरपरिषद अधिकाऱ्यांना नसावे हे शक्यच नाही. केवळ आर्थिक लोभापायी शासन दरबारी व अधिकारी हे येणाऱ्या पिढीला प्रदूषणाच्या भयानक खाईमध्ये धकवीत असल्याचे चित्र वणीमध्ये दिसत आहे.