सुुनिल कातकडे यांनी मारली बाजी; कोंगरे-मत्तेंना धक्का
जिल्हा बँक निवडणूक: मारेगावातून किरण देरकर, झरीतून राजू येलटीवार विजयी
पुरुषोत्तम नवघरे, वणी : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत वणी विभागाने लक्षवेधी निकाल नोंदविला आहे. वणी गटातून अपक्ष उमेदवार सुनील कातकडे, मारेगाव गटातून किरण देरकर, तर झरी गटातून राजीव येलटीवार विजयी झाले आहेत. वणी गटातील थेट राजकीय लढतीत अपक्ष कातकडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार तथा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे आणि महायुतीचे उमेदवार दीपक मत्ते यांना मागे टाकत विजय मिळविल्याने या निकालाची विशेष चर्चा सुरू झाली आहे.
यवतमाळ येथे सुरू असलेल्या मतमोजणीत वणी विभागातील एकूण 68 मतदारांपैकी तिन्ही विजयी उमेदवारांना प्रत्येकी सुमारे 40 मते मिळाल्याची माहिती समोर आली आहे. निकाल स्पष्ट होताच मतमोजणी केंद्राबाहेर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल उधळत आणि जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला.
वणी गटात कातकडे यांची बाजी
वणी गटात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होईल, अशी चर्चा होती. बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांचा अनुभव आणि महायुतीकडून दीपक मत्ते यांची उमेदवारी यामुळे लढतीकडे विशेष लक्ष लागले होते. मात्र, अपक्ष सुनील कातकडे यांनी दोन्ही प्रमुख राजकीय आघाड्यांच्या उमेदवारांना मागे टाकत विजय मिळविला.
कातकडे यांच्या विजयामुळे वणी गटातील पारंपरिक राजकीय गणितांना धक्का बसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. स्थानिक पातळीवरील मतदारांशी संपर्क, वैयक्तिक समीकरणे आणि निवडणुकीतील रणनीती यांचा निकालावर प्रभाव पडल्याची चर्चा सुरू आहे.
मारेगाव गटातून किरण देरकर यांनी विजय मिळविला, तर झरी गटातून राजीव येलटीवार विजयी झाले. झरी-झरीजामणी गटातील निवडणूक यापूर्वीपासूनच चुरशीची मानली जात होती. जिल्हा बँक निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात या गटातील प्रत्येक मताला महत्त्व प्राप्त झाले होते.
जिल्हा बँकेच्या सत्ताकारणावर परिणाम?
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सुरुवातीपासूनच राजकीय प्रतिष्ठेची बनली होती. उमेदवारीवरून निर्माण झालेली चुरस, आघाडी-युतीतील समीकरणे, बंडखोरी आणि निवडणुकीतील डावपेच यामुळे निवडणुकीचे वातावरण तापले होते. 11 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडल्यानंतर 12 ऑक्टोबरच्या मतमोजणीकडे सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
वणी विभागातील या निकालामुळे जिल्हा बँकेच्या पुढील सत्ताकारणात या तीन विजयी संचालकांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. विशेषतः वणी गटातून अपक्ष उमेदवाराचा झालेला विजय हा स्थानिक राजकीय समीकरणांच्या दृष्टीने चर्चेचा विषय ठरला आहे.


Comments are closed.