बहुगुणी डेस्क, वणी: नदीच्या शांत किनाऱ्यावर संध्याकाळी धुराचे झुरके हवेत विरत होते… पण वणी पोलिसांची नजर चुकवणं सोपं नव्हतं. निर्गुडा नदीच्या काठावर तीन तरुण चिलम ओढत बसले होते, आणि त्याच क्षणी पोलिसांची गस्त टीम गोपनीय माहितीच्या आधारे तिथं पोहोचली. धुरात हरवलेली तिघांची संध्याकाळ एका क्षणात पोलीस ठाण्यात पोहोचली. दुसऱ्या दिवशी, बाजार समितीजवळ स्ट्रीट लाईटच्या उजेडात दोन तरुणांनी गांजाचे झुरके घेतले, पण पोलिसांची नजर तिथंही पोहोचली होती. वणी शहरात दोन दिवसांत दोन ठिकाणी झालेल्या या कारवायांनी मादक पदार्थविरोधी मोहिमेला वेग दिला आहे.
निर्गुडा नदीकाठावर तीन गंजेडे गजाआड
प्रथम कारवाई 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी गंगाविहार परिसरातील निर्गुडा नदीकाठावर झाली. गस्तीवर असलेल्या पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पंचांच्या उपस्थितीत छापा टाकला असता, प्रज्योत (वय 25, रा. टागोर चौक), नितेश (वय 24, रा. संताजी शाळेजवळ) आणि सचिन (वय 24, रा. रंगारीपुरा, वणी) हे तिघे चिलममध्ये गांजा भरून झुरके मारताना आढळले.
बाजार समितीजवळ स्ट्रीट लाईटखाली गांजाचे झुरके
दुसरी कारवाई 6 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सुमारे 7:30 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात झाली. स्ट्रीट लाईटच्या उजेडात साहिल (वय 24, रा. पट्टाचारा नगर, वणी) आणि प्रेम (वय 19, रा. जैन ले-आऊट, वणी) हे दोघे गांजाचे झुरके घेताना पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
सर्व आरोपींच्या अंगझडतीदरम्यान वापरलेली चिलम, आगपेटी आणि जळलेल्या काड्या असा पुरावा जप्त करण्यात आला. पंचासमक्ष गांजा सेवनाची कबुली दिल्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रवाना करण्यात आले. त्यांच्यावर NDPS Act 1985 अंतर्गत कलम 8(क) सह कलम 27 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे शहरातील नशेच्या अड्ड्यांना लगाम लागण्याची चिन्हे दिसत आहेत.



Comments are closed.