वंदे मातरम् स्तोत्राला 150 वर्षे, वणीत गौरव दिन साजरा

हजारो विद्यार्थ्यांचे सामूहिक गायन; स्वातंत्र्य संग्रामातील प्रसंग नाटिकेतून सादर

बहुगुणी डेस्क, वणी : भारतीय संस्कृतीत जननी, जन्मभूमी आणि जगन्माता यांची उपासना ही त्रिसूत्री मानली जाते. मातृभक्ती ही इथल्या मातीचा स्थायीभाव आहे. याच भावनेला साजेसा गौरव दिन वणी येथे साजरा करण्यात आला. वंदे मातरम् या राष्ट्रगीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शासकीय मैदानावर आयोजित कार्यक्रमात हजारो विद्यार्थ्यांनी सामूहिक गायनातून भारतमातेच्या स्तुतीचा जयघोष केला.

कार्यक्रमाचे मुख्य वक्ते अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा नगर परिषदेचे प्रभारी प्रशासन अधिकारी गजानन कासावार यांनी वंदे मातरम् गीताच्या ऐतिहासिक प्रवासावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “बंकिमचंद्र चटोपाध्याय यांना 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामानंतरच्या विपरीत परिस्थितीत हे स्तवन सुचले. त्या दोन शब्दांनी स्वातंत्र्य लढ्याला धार दिली. वंदे मातरम् म्हणजे ‘माते तुला वंदन’ — हा साधा अर्थ असला तरी त्यात इंग्रजांना भय वाटत होते. रविंद्रनाथ टागोर व श्री अरविंद यांनी या गीतात मंत्रशक्ती पाहिली. 1896 मध्ये टागोर यांनी प्रथम गायन केले आणि 1905 मध्ये वंगभंग आंदोलनात या घोषणेने आसमंत दुमदुमला.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार होते. त्यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाचा मागोवा घेत देशाच्या प्रत्येक मानचिन्हाचा आदर करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. प्रमुख अतिथी म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समिर थेरे, पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर, तालुका क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार, प्राचार्य प्रसाद खानझोडे उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य तथा वंदे मातरम् तालुका स्तरीय आयोजन समितीचे सचिव संजय तेलतुंमडे यांनी केले. त्यांनी गीताच्या सार्धशताब्दी निमित्ताने आयोजित उपक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमाची सुरुवात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वातंत्र्य संग्रामावरील नाटिकेने झाली. त्यानंतर बरोबर 9.50 वाजता हजारो विद्यार्थ्यांनी सामूहिक वंदे मातरम् गायन केले. या गीताचे संगीत लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिले होते. या सामूहिक गायनाने वातावरण राष्ट्रभक्तीने भारले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पनिदेशिका साधना माटे यांनी केले. आभार प्रदर्शन शिल्पनिदेशक शशिकांत लेनगुळे यांनी केले.

Comments are closed.